स्व. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा
येथील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात पुढील महिन्यात होणाऱ्या स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरिय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनास मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्याचा, तसेच स्पर्धेच्या स्वागताध्यक्षपदी विक्रमसिंह पाचपुते यांची निवड करण्याचा निर्णय आज संयोजन समितीच्या सभेत घेण्यात आला.
राज्य सरकार, राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघ यांनी यंदाच्या स्व. खशाबा जाधव राज्यस्तरिय कुस्ती स्पर्धा नगर शहरात घेण्याचे व त्या १० ते १३ जानेवारी दरम्यान होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली संयोजन समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेच्या नियोजनासाठी उद्घाटन व समारोप कार्यक्रम समिती, तांत्रिक समिती, निवास व भोजन व्यवस्था समिती, प्रसिद्धी व स्मरणिका समिती, वैद्यकिय व्यवस्था व वाहतूक समिती अशा विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. राज्य सरकारने या स्पर्धेसाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. स्पर्धेत राज्यातून २०० हून अधिक स्त्री-पुरुष मल्ल सहभागी होणार आहेत, तसेच हिंद व महाराष्ट्र केसरी विजेते उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा भव्य स्वरुपात व यशस्वीपणे पार पडतील, असा विश्वास पाचपुते यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
सभेस आ. अनिल राठोड, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, क्रीडा उपसंचालक आनंद व्यंकेश्वर कुस्तीगार परिषदेच्या तांत्रिक समितीचे अध्यक्ष विलास कथुरे, जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी अजय पवार, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, मनपाचे उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, युवा नेते विक्रमसिंह पाचपुते आदी उपस्थित होते. नंतर समितीने संकुलास व तेथील जलतरण तलावास भेट देऊन पाहणी
केली.