गोरेगावमध्ये सध्या सुरू असलेल्या ‘विवेकानंद चैतन्योत्सव’ उपक्रमांतर्गत तीन दिवसांची ‘विवेकानंद व्याख्यानमाला’ शुक्रवार, १७ जानेवारीपासून सुरू होत आहे. ‘गोरेगावकर नागरिक’ आणि ‘मसुराश्रम’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे.
या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प शुक्रवार, १७ जानेवारी रोजी माजी सनदी अधिकारी व ‘चाणक्य मंडल परिवार’चे प्रणेते अविनाश धर्माधिकारी गुंफणार आहेत. आजच्या तरुणांसाठी ‘योद्धा संन्यासी’ हा त्यांचा विषय असेल. शनिवार, १८ जानेवारी रोजी ‘स्वामी विवेकानंदांचे महिलांबाबतचे विचार’ या विषयावर गीतांजली जोशी यांचे तर ‘स्वामी विवेकानंदांचे युवकांना आवाहन’ या विषयावर प्रकाश पाठक यांचे व्याख्यान होणार आहे. तिन्ही व्याख्याने मसुराश्रम, पांडुरंगवाडी, चौथी गल्ली येथे रोज सायंकाळी ७.०० वाजता सुरू होतील.
‘चैतन्योत्सवां’तर्गत विशाल रक्तगटसूची तयार करणे, गोरेगावमधील सुमारे १० हजार शालेय विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांचे चरित्र वाटणे, दुचाकी रॅली, महिलांसाठी निबंध स्पर्धा व सामूहिक गीतगायन स्पर्धा आदी उपक्रम आयोजित करण्यात आले. रक्तगटसूची उपक्रमात सुमारे ४ हजार रक्तदात्यांची सूची तयार झाली असून तिचे काम अजूनही सुरू आहे. या सर्व उपक्रमात गोरेगावकरांनी उत्साही सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – अदिती : ९००४५७७९१०, श्रेयस : ९८१९८६६२२८