शिवडी
चिंचपोकळी, लालबाग, परळ, शिवडी अशा मराठीबहुल परिसरात विस्तारलेला शिवडी मतदारसंघ शिवसेनेचा गड म्हणूनच ओळखला जात होता. शिवसेनेच्या तिकिटावर सलग दोन वेळा छगन भुजबळ येथून विजयी झाले. छगन भुजबळ यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला होता. शिवसेनेने या मतदारसंघातून १९९५मध्ये बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. त्यानंतरच्या सलग दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर बाळा नांदगावकर विजयी झाले. त्यानंतर २००९ मध्ये झालेली निवडणूक बाळा नांदगावकर यांनी मनसेच्या उमेदवारीवर लढविली आणि जिंकली. शिवसेनेच्या या गडाला खिंडार पडल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जिव्हारी लागले होते. कमी दाबाने होत असलेला पाणीपुरवठा, दुर्दशा झालेली मैदाने, वाहतूक कोंडी, पार्किंगसाठी अपुरी जागा, उद्यानांचा रखडलेला विकास, पदपथांवरील अतिक्रमण, फेरीवाल्यांचा सुळसुळाट अशा अनेक समस्यांनी या मतदारसंघातील नागरिक त्रस्त आहेत. या मतदारसंघातील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नाचे घोंगडे भिजत पडले आहे.
शिवसेनेचा गड आपल्याकडे राखण्यासाठी मनसेने या वेळीही विद्यमान आमदार बाळा नांदगावकर यांना रिंगणात उतरविले आहे. तर गेलेला गड परत काबिज करण्यासाठी शिवसेनेने विभागप्रमुख अजय चौधरी यांना आखाडय़ात उतरविले आहे. भाजपने शलाका साळवी यांना, काँग्रेसने नगरसेवक मनोज जामसुतकर यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेसने नंदकुमार काटकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र खरी लढत बाळा नांदगावकर विरुद्ध अजय चौधरी यांच्यामध्येच होईल असे चित्र आहे. भाजपच्या शलाका साळवी शिवसेनेची मते मिळविण्यात यशस्वी झाल्या तर पुन्हा एकदा मनसेच्या विजयावर शिक्कामोर्तब होऊ शकेल.
दुर्लक्षित असलेल्या शिवडी किल्ल्याला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्यात यश आले असून किल्ल्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यात आला आहे. तसेच मोडकळीस आलेल्या जुन्या चाळींचा प्रश्न ऐरणीवर असून या मतदारसंघातील सुमारे २००हून अधिक चाळींची आमदार निधीतून दुरुस्ती करून घेतली. विभागातील डायलिसिस सेंटर, नरे पार्क मैदानांच्या विकासासाठी कोटय़वधी रुपये निधी मिळवून दिला आहे.
मनसे आमदार बाळा नांदगावकर
मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात नागरी सुविधांचा अभाव असून तेथे सुविधा उपलब्ध करण्यास पालिकेला परवानगी देत नाही. या क्षेत्रात एकही आरोग्य केंद्र नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. बीडीडी चाळी, अभ्युदय नगरातील ४७ इमारती, २२ झोपडपट्टय़ांचा पुनर्विकास रखडला आहे. भोईवाडा गावातील पुनर्विकास अडला आहे. या प्रश्नांकडे आमदारांनी लक्षच दिलेले नाही.
शिवसेना उमेदवार अजय चौधरी
उमेदवार
काँग्रेस – मनोज जामसूतकर ल्ल शिक्षण – १२ वी ल्ल मालमत्ता – जंगम ४५,६९,९४९ रु., स्थावर – २,०२,०२,००० रु.
राष्ट्रवादी काँग्रेस – नंदकुमार काटकर ल्ल शिक्षण – बारावी ल्ल मालमत्ता – जंगम ४९,८७,०४४ रु., स्थावर २,००,४०,००० रु.
शिवसेना – अजय चौधरी ल्ल शिक्षण – ११ वी ल्ल मालमत्ता – जंगम ३९,३६,४१५ रु., स्थावर ८५,९९,००० रु.
भाजप – शलाका साळवी ल्ल शिक्षण -ल्ल मालमत्ता – जंगम ३,२८,००० रु.; स्थावर – ००
मनसे – बाळा नांदगावकर – शिक्षण – जुनी एसएससी उत्तीर्ण ल्ल मालमत्ता – जंगम १,३३,४९,२२६ रु., स्थावर ३,५५,७०,५००
संग्रहित लेख, दिनांक 7th Oct 2014 रोजी प्रकाशित
इतिहासाची पुनरावृत्ती..?
चिंचपोकळी, लालबाग, परळ, शिवडी अशा मराठीबहुल परिसरात विस्तारलेला शिवडी मतदारसंघ शिवसेनेचा गड म्हणूनच ओळखला जात होता.

First published on: 07-10-2014 at 06:19 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voter indicator shivadi