एरवी कडक शिस्तीत असणाऱ्या मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचा विनम्र स्वभाव तसा सर्वाना परिचित आहे. त्याचा अनुभव पुन्हा एकदा एका जाहीर कार्यक्रमात आला. मारिया यांनी व्यासपीठावरच आपल्या विभागातील एका अधिकाऱ्याच्या मातोश्रींसमोर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. निमित्त होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांनी लिहिलेल्या ‘घात’ या कांदबरीच्या पुस्तक प्रकाशनाचे. नायगाव पोलीस मुख्यालयातील झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर पाटील यांच्या मातोश्री आल्या तेव्हा विनप्रपणे मारिया यांनी नतमस्तक होत त्यांचे आशिर्वाद घेतले. स्वत: पाटील पत्नीसह व्यासपाठीवर आपल्या मातोश्रींच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्याने वातावरण भावस्पर्शी झाले होते.
मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे प्रमुख व्यंकट पाटील यांनी पोलीस दलात काम करत असताना एका प्रसंगावर आधारीत ‘घात’ ही कांदबरी लिहिली आहे. त्याचे प्रकाशन शनिवारी पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ साहित्यिका विजया वाड यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया, सहपोलीस आयुक्त सदानंद दाते, अतिरिक्त पोलीस आयुक्त हिमांशू रॉय, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आनंद पोतदार, विशेष सरकारी अभियोक्ता राजा ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पाटील यांनी व्यासपीठावर आपल्या मातोश्री.. यांना बसवले होते. त्यांचा सत्कार झाला तेव्हा आयुक्त राकेश मारिया यांनी वाकून नतमस्तक होत त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे वातावरणात चांगलेच भावनिक बनले होते. पोलीस दलातील रुक्ष कामातून वेळ काढूनही पाटील यांनी कांदबरी लिहिल्याने मारिया यांनी त्यांचे कौतुक केले.
तर पाटील यांच्याकडून वेळेचे व्यवस्थापन शिकणार असल्याचे हिमांशू रॉय यांनी सांगितले. ही कांदबरी पहिली असूनही ती अतिशय चित्ताकर्षक आणि उत्कंठावर्धक झाल्याचे गौरवोद्गार विजया वाड यांनी काढले. प्रख्यात साहित्यिक बाबा कदम यांच्यापासून प्रेरणा घेत लेखनास सुरवात केल्याचे व्यंकट पाटील म्हणाले. कुलस्वामिनी प्रकाशनातर्फे ही कांदबरी प्रकाशित करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी आपल्या सहकाऱ्यास शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमास हजर होते.