कोयना धरणात यंदा विक्रमी अशी ७१ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. गतवर्षी आजमितीला म्हणजेच पावसाळी हंगामाचा दीड महिना उलटला तरी एक तृतीयांशही न भरलेल्या कोयना धरणाचे काल ४ फुटांवर असलेले सहा वक्र दरवाजे आज सायंकाळी ४ वाजता १० फुटांपर्यंत उचलून कोयना नदीपात्रात सुमारे ५० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी पाटणनजीकचा संगमनगर धक्का पूल आठव्या दिवशीही पाण्याखाली असून, मुळगावसह ठिकठिकाणचे कमी उंचीचे व फरशी पूल पाण्याखाली गेल्याचे वृत्त आहे. कृष्णा, कोयना नद्यांकाठी सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. प्रशासनाने कराडच्या पाटण कॉलनीनजीकच्या कोयना नदीकाठावरील ९ कुटुंबांचे तत्काळ स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्वच सिंचन प्रकल्प क्षमतेने भरले असून, निम्म्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गतवर्षी अत्यल्प पावसामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा याखेपेस मात्र, ओला दुष्काळ टळावा म्हणून वरूणराजाची आळवणी करीत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या १० दिवसांतील सततच्या जोमदार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पात झपाटय़ाने वाढ होताना, बहुतांश प्रकल्प शिगोशिग भरून वाहत आहेत. तर उर्वरित प्रकल्प क्षमतेने भरू पहात आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख बहुतांश प्रकल्पातून उर्वरित पावसाळय़ाचे दिवस व संभाव्य पूरस्थिती गांभीर्याने घेऊन पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तरीही प्रमुख १२ प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता सुमारे २६१ टीएमसी असताना, त्यात सध्या २१५.४० टीएमसी म्हणजेच ८२.५२ टक्क्यांहून जादा पाणीसाठा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख प्रकल्पात असलेला सध्याचा पाणीसाठा पुढील प्रमाणे- पाणीसाठा टीएमसीमध्ये तर कंसात त्याची टक्केवारी-कोयना जलसागर ८७.९० (८३.५३) वारणा २९.३४ (८५.३४), दूधगंगा २१.०८ (८३), राधानगरी ८.३७ (१००), धोम ९.४६ (८३.३६), कण्हेर ७.९८ (७८.९६), उरमोडी ७.८७ (८१.६३), तारळी ५.०१७ (८६.७८), धोम बलकवडी ३.४४ (८६.७८), तर सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरील पुणे जिल्ह्यातील वीर ७.३४ (७८.०१), नीरा देवघर ९.३५ (७९.७२), भाटघर १८.२५ (७७.६७). आज सकाळी ८ वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील पावसाची तालुकानिहाय सरासरी व कंसात एकूण पाऊस- सातारा २१.९ (५३४), जावली २१.५ (८८०.१), कोरेगाव ७.६ (२२७.३), वाई ११.५ (४७१.७), महाबळेश्वर ८६.३ (१४०३.५), खंडाळा ६.५ (२६९.३) तर दुष्काळी फलटण ४.२ (१४३.८), माण १.२ (१०५.९) व खटाव तालुक्यात ४.८ एकूण १८०.७ मि. मी. पाऊस झाल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने कळवली आहे.
संततधारेमुळे कोयना धरणाचे साडेचारफुट उचलण्यात आलेले ६ वक्र दरवाजे आज सकाळी १० वाजता सात फुटापयर्ंत उचलून पाणी सोडण्यात आले मात्र, पावसाचा जोर राहिल्याने सायंकाळी ४ वाजता दरवाजे १० फुटांपर्यंत उचलून ४७ हजार ७१६ क्युसेक्स पाणी कोयना नदीत विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, धरणात ५६ हजार ४०७ क्युसेक्स पाण्याची आवक होत असून, आवक पाण्याच्या तुलनेत पाण्याचा विसर्गही करण्याचे धोरण धरण व्यवस्थापनाने घेतले आहे. सध्या धरणाची जलपातळी २,१५० फुट असून, पाणीसाठा ८७.९० टीएमसी म्हणजेच ८३.५३ टक्के आहे. सरासरी कराड तालुक्यात ११.२८ एकूण ३०५.०८ तर, पाटण तालुक्यात ३७.७ एकूण १,०९४.०७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत गेल्या ३६ तासात धरणक्षेत्रातील कोयनानगर विभागात १३७ एकूण ३,१२०, नवजा विभागात २३९ एकूण ३,८१२, महाबळेश्वर विभागात १९६ एकूण ३,४२५ तर, प्रतापगड विभागात ३०७ एकूण ३,८२९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रातील हा सरासरी ३,५४६.५ मि. मी. पाऊस झाला असून, गतवर्षी हाच पाऊस १ हजार ५६९.६६ मि. मी. नोंदला गेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास अडीचपट पाऊस झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jul 2013 रोजी प्रकाशित
कोयना धरणाचे दरवाजे १० फुटांवर; कृष्णा, कोयनाकाठी दक्षतेचे आदेश
कृष्णा, कोयना नद्यांकाठी सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. प्रशासनाने कराडच्या पाटण कॉलनीनजीकच्या कोयना नदीकाठावरील ९ कुटुंबांचे तत्काळ स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

First published on: 24-07-2013 at 02:05 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Warning of alertness to krishna koyna area