गोदावरी कालव्यांना दोन दिवसात ओव्हरफ्लोचे पाणी न सोडल्यास दारणा धरण व नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या गेटची कुलूपे तोडून पाणी घेण्याचा इशारा गोदावरी सर्वपक्षीय कालवा पाटपाणी संघर्ष समितीने बुधवारी दिला. त्यासाठी राहाता तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून मागणीला पािठबा दिला.
गोदावरी कालवा पाणी बचाव संषर्घ समितीच्या वतीने दारणा व गंगापूर धरणातून नदीपात्रात सोडलेले ओव्हरफ्लोचे पाणी बंद करून ते उजव्या व डाव्या कालव्यांना सोडावे अशी मागणी करण्यात आली. गोदावरी लाभक्षेत्रातील हक्काचे ११ टीएमसी पाणी मिळालेच पाहिजे अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. इंडीया बुल्स कंपनीला थेंबभरही पाणी देऊ नये, नगर व नाशिकसाठी स्वतंत्र गोदावरी खोरे विकास महामंडळ स्थापन करावे, कालव्यांचे नूतनीकरण एका वर्षांत पूर्ण करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
सकाळी १० वाजता त्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्ते सामील झाल्याने यास महामोर्चाचे स्वरुप आले होते. शहरातील मंदिरापासून निघालेला हा शहरातील पहिलाच महामोर्चा बघावयास मिळाला. गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील राहात्यासह वाकडी, चितळी, जळगाव, अस्तगाव, नांदुर्खी, पिंपळवाडी, रुई, शिर्डी, सावळीविहीर, न. पा.वाडी, गोंडेगाव आदी गावातील हजारो शेतकरी मोर्चात सामील झाले होते.  
पाणी सोडण्याबाबत लाभक्षेत्रावर अन्याय केला जातो. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी जो निर्णय दिला आहे, तोच निर्णय राज्यातील इतर धरणांसाठी का दिला जात नाही. असा सवालही या वेळी केला. मराठवाडय़ाला एक न्याय व आम्हाला वेगळा न्याय हे योग्य नाही असा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.  संघर्ष समितीचे संयोजक राजेंद्र बापू, दिलीप रोहोम, नितीन कापसे, गंगाधर चौधरी, डॉ. सुजय विखे, राहात्याचे नगराध्यक्ष कैलास सदाफळ, गणेशचे अध्यक्ष नारायण कार्ले, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव शेळके, डॉ. एकनाथ गोंदकर, अशोक दंडवते आदी या मोर्चात सहभागी झाले होते.