कमिशन व मार्जिन वाढवून मिळावे तसेच अन्न सुरक्षा विधेयकाचे लाभार्थी निवडण्याचे काम लादू नये यासह अन्य काही मागण्यांसाठी जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाने येत्या दि. २० पासून जिल्ह्य़ात बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. संपाच्या काळात रॉकेल व धान्य उचलणार नसल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरूण हिरडे, कार्याध्यक्ष देवीदास देसाई, सचिव मुकूंद सोनटक्के यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हा पुरवठा अधिकारी सोपनराव कासार यांना याबाबत निवेदन दिले. या निवेदनात दुकानदारांनी म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून सध्या सुरू असलेल्या अल्प मार्जीन व कमिशनमध्ये व्यवसाय शक्य नाही त्यामुळे कमिशन व मार्जीन वाढवून द्यावे अशी मागणी शासन स्तरावर मांडुनही दखल घेतली जात नाही. शासन प्रत्येक घटकाची दखल घेऊन आता सातवा आयोग नेमण्याच्या तयारीत आहे परंतू गेल्या चाळीस वर्षांत धान्य दुकानदारांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये कुठलीही वाढ नाही. कुठल्याही सोयी सुविधा नाहीत. गेल्या पंचवार्षीकपासून मिटींग व आमुक नमुन्यात माहिती द्या, तमुक नमुन्यात माहिती द्या असे म्हणून दुकानदारांना मोफत राबवून घेत आहे.
आता तर अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी निवडण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदारांकडे असल्याचे समजताच अनेक कार्डधारकांकडून दुकानदारांना धमक्या सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागात ७६ टक्के लाभार्थी निवडायचे आहेत. मात्र शहरात केवळ ४४ टक्के लाभार्थी निवडायचे आहेत. सर्वानाच स्वस्तात धान्याची अपेक्षा असल्यामुळे काम करणे अवघड झाल्याने लाभार्थी निवडण्याचे काम शासन स्तरावर करावे, मार्जिन कमीशन वाढवून द्यावे अन्यथा धान्य न उचल्याचा व वितरण न करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.