पालिका प्रशासनाकडून गेल्या दहा वर्षांत शहरातील प्रमुख रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली होती. आता विकास कामांना सुरुवात झाली असून येत्या काही महिन्यातच वरोरा शहराचा कायापालट करणार असल्याचा मनोदय नगराध्यक्ष विलास टिपले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
या जिल्ह्य़ाचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पालिकेअंतर्गत विकास कामे होत असून संपूर्ण रस्त्यांचे डांबरीकरण काही दिवसातच केले जाणार आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या महात्मा गांधी बगीच्याची संरक्षण भिंत बांधण्यात आली असून बालगोपालांना खेळण्यासाठी व नागरिकांना फिरण्यासाठी अद्ययावत बगीचा निर्माण केला जाणार आहे. पर्यावरण मंत्रालयाकडून येथील तलावासाठी निधी उपलब्ध झाला आहे. गांधीसागर तलावाचे संवर्धन व सौंदर्यीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचेही टिपले यांनी यावेळी सांगितले. अग्निशमन केंद्र तयार झाले असून वाहनही घेण्यात आले आहे. रस्त्यावर भरत असलेल्या भाजीबाजाराची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यात आली असून बाजारात बांधून ठेवलेल्या ओटय़ांची दुरुस्ती करून त्या परिसराला संरक्षण भिंत बांधली जाणार आहे. तब्बल २६ वर्षांनंतर शहराचा विकास योजना आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे शहराच्या विकासात मोठा हातभार लागणार आहे. मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी आलेले विद्युत खांब बाजूला करण्यात येणार आहेत. विस्तारित पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. आंबेडकर चौक ते आनंदवन चौकापर्यंत मध्यभागी लावलेले विद्युत खांब गंजलेले असल्यामुळे ते काढून अद्ययावत अशी आकर्षक टी-५ प्रकाश व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही टिपले यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व महात्मा गांधी चौकाचा परिसर सुशोभित केला जाणार असून काही दिवसातच घनकचऱ्याची विल्हेवाट लावून सुंदर व स्वच्छ वरोरा शहर करण्याचा मानस नगराध्यक्ष विलास टिपले यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला सत्तारूढ गटाचे सर्व नगरसेवक हजर होते.