वीज केंद्रासाठी लागणारा धुतलेला कोळसा घेणे महाजनकोने बंद केल्याने या जिल्हय़ातील आठ पैकी पाच कोल वॉशरीज बंद पडल्या आहेत. त्याचा परिणाम जवळपास तीन हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
वीज निर्मितीसाठी चांगल्या प्रतीचा कोळसा मिळावा म्हणून महाजनकोने काही वर्षांपूर्वी वॉश कोल अर्थात धुतलेला कोळसा वापरण्याचा निर्णय घेतला होता. वॉश कोलचा निर्णय होताच या जिल्हय़ात कोल वॉशरीजचे अक्षरश: पेव फुटले आणि बघता बघता अवघ्या काही दिवसात एक दोन नव्हे तर चक्क दहा कोल वॉशरीच या एकाच जिल्हय़ात सुरू झाल्या. या वॉशरीज सुरू करण्यात गुप्ता कोल कंपनी, भाटीया इंटरनॅशनल व आयरन या तीन कंपन्यांनी आघाडी घेतली होती. गुप्ता कोलने घुग्घुस, भद्रावती, पांढरपौनी, वणी व राजुरा येथे वॉशरी सुरू केली. त्या पाठोपाठ भाटियाने घुग्घुस, पांढरपौनी, वणी व राजुरा तर आर्यने राजुरा व घुग्घुस वणी मार्गावर वॉशरीच सुरू केली. मात्र अवघ्या काही महिन्यातच वॉशरीच मधून वीज केंद्राला होणारा कोळसा पुरवठा अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचे निदर्शनास आले.
अशाही परिस्थितीत जवळपास चार ते पाच वष्रे काम सुरू होते. या दरम्यान वॉशरीजमधून वॉश कोल ऐवजी भुकटी, दगडांचाही पुरवठा सुरू झालेला होता. महाजनकोचे बडे अधिकारी व वॉशरीजच्या संगनमताने हा सर्व व्यवहार चालायचा. मात्र ऊर्जा मंत्रालयाने वॉशरीजमधील वॉश कोल वापरण्याऐवजी महाजनकोची स्वतंत्र वॉशरी सुरू करण्याचा तसेच इंपोर्टेड कोल वापरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वॉशरीजचे काम पूर्णत: बंद झाले. एकाच वेळी सर्व वॉशरीजचे काम महाजनकोने बंद केल्याने या जिल्हय़ातील दोन वॉशरीज तर सुरूवातीच्या काळातच बंद पडल्या. मात्र, मागील तीन ते चार महिन्याच्या कालावधीत आणखी पाच कोल वॉशरीज पूर्णत: बंद पडल्याने जिल्हय़ातील तीन हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. भाटीया कंपनीची केवळ राजुरा येथील वॉशरी सुरू असून इतर तीन ठिकाणच्या वॉशरीज बंद पडल्या आहेत. गुप्ता व आर्यन या कंपनीचीही राजुरा येथील वॉशरी सुरू असून इतर सर्व बंद पडल्या आहेत.
एका वॉशरीत किमान तीनशे कामगार व २५ कर्मचारी काम करीत होते. पाच वॉशरीज बंद असल्याने किमान तीन हजार कामगारांचा रोजगार हिरावला गेला आहे. महाजनकोनेही वॉशरीजला काम देणे पूर्णत: बंद केलेले असल्याने भविष्यातही या वॉशरीज सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. वॉश कोल मधील भ्रष्टाचारामुळेच तीन हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. येत्या काळात वीज केंद्राच्या परिसरातच महाजनकोची वॉशरी सुरू होत आहेत. वीज केंद्राचे मुख्य अभियंता सुरेश गोहोत्रे चीन येथे जाऊन तेथील वॉशरीजचा अभ्यास करून आले. त्यांनी वॉशरीजचे प्रस्ताव ऊर्जा मंत्रालयात सादर केले. मंत्रालयाने त्याला मंजुरीही प्रदान केली असून लवकरच वॉशरीजच्या कामाला सुरूवात होणार आहे. महाजनकोच स्वत:ची वॉशरी सुरू करणार असल्याने येत्या काळात या बंद पडलेल्या पाच वॉशरीज पूर्ववत सुरू होण्याची शक्यता पूर्णत: मावळली आहे. दरम्यान वॉशरीजमधील बेरोजगार कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हे उपोषण सुरू असून या कामगारांना कोणी वाली नसल्याने प्रश्न तसाच रेंगाळलेला आहे. सध्यातरी एका पाठोपाठ एक वॉशरीज बंद पडल्यामुळे बहुतांश कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर बेरोजगारी व उपासमारीची वेळ आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2012 रोजी प्रकाशित
धुतलेल्या कोळशाची खरेदी थांबविली; चंद्रपुरातील पाच कोल वॉशरीज ठप्प
वीज केंद्रासाठी लागणारा धुतलेला कोळसा घेणे महाजनकोने बंद केल्याने या जिल्हय़ातील आठ पैकी पाच कोल वॉशरीज बंद पडल्या आहेत. त्याचा परिणाम जवळपास तीन हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

First published on: 17-11-2012 at 12:48 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wash coal buying has stoped five coal wash factories wind up