लग्नसोहळा म्हटला की, ग्रामीण भागात उत्साह काही औरच असतो. शहराप्रमाणे श्रीमंती थाट दाखविण्याकरिता ग्रामीण भागात हरप्रकारे प्रयत्न होतात. हुंडय़ाची देवाणघेवाण, डीजे साऊंडचा धूमधडाका, फटाक्यांची आतषबाजी, मद्याचे पाट.. यात आपला सोहळा कुठेही कमी पडणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली जाते. परंतु, या माध्यमातून हुंडय़ासारख्या अनिष्ट प्रथांना बळ देतानाच आपण ध्वनी प्रदूषणातही भर टाकतो, याचे भान राखले जात नाही. गावांतील लग्न वा तत्सम सोहळ्यात दिसणारे हे चित्र जाणीवपूर्वक बदलविण्याचा प्रयत्न महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहिमेत करण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेल्या यादवगवळी समाजाने ध्वनी प्रदूषण व वादविवादांना प्रतिबंध करण्यासाठी डीजे या कर्णकर्कश वाद्यावर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय, त्याचे उदाहरण म्हणता येईल. शैक्षणिकदृष्टय़ा पिछाडीवर असलेल्या या समाजाने सामाजिक प्रश्नात प्रगल्भता दाखवत लग्न सोहळ्यात उधळपट्टी व ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांना चपराक दिली आहे. ग्रामीण भागात लग्न वा तत्सम सोहळे थाटात साजरे करण्याची विचित्र परंपरा आहे. हुंडय़ाच्या देवघेवीलाही कोणाचा आक्षेप नसतो. त्याकरिता प्रसंगी जमीन गहाण ठेवून कर्जही काढले जाते. या कारणास्तव कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही अनेक प्रकार घडले आहेत. असे असूनही लग्नासारख्या सोहळ्यात थाट काही केल्या कमी होत नसल्याचे विदारक चित्र आहे. दिखाऊ स्वरूपाचे मानपान सांभाळण्याकरिता कर्जाचा डोंगर शिरावर घेण्यास प्रसंगी मागेपुढे पाहिले जात नाही. डीजेचीही ग्रामीण भागात चांगलीच धूम आहे. बेधुंद होऊन वरातीत नाचगाण्यात सारे मग्न होत असल्याने त्यावरून अनेकदा वादही उद्भवतात. या वादाचे रूपांतर हाणामारीतही झाल्याचे पाहावयास मिळते. समाजाची ही मानसिकता बदलविण्याचा प्रयत्न तंटामुक्त गाव मोहिमेद्वारे करण्यात येत आहे.
वास्तविक, गावातील तंटे सामोपचाराने मिटविण्याबरोबर तंटामुक्त गाव मोहिमेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास तितकेच महत्त्व देण्यात आले आहे. त्याअंतर्गत हुंडाबळी रोखणे, हुंडय़ासारख्या अनिष्ट प्रथा रोखणे, ध्वनिक्षेपकाचा नियमानुसार मर्यादित वापर, वरातींमधील गैरप्रकारांना प्रतिबंध करणे या दृष्टिकोनातून प्रयत्न करणाऱ्या गावांना पाच गुण दिले जातात. या संदर्भात जळगाव जिल्ह्यातील यादवगवळी समाजाने घेतलेला निर्णय उल्लेखनीय म्हणता येईल. या समाजात गेल्या दहा वर्षांपासून अवास्तव खर्चाला फाटा देण्यासाठी सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जात आहेत. तथापि, त्यामुळे साखरपुडे धूमधडाक्यात होऊ लागले होते. सामूहिक विवाह सोहळे साध्या पद्धतीने व साध्या वाद्यात होतात. म्हणून साखरपुडा समारंभ थाटात, कर्णकर्कश डीजे वाद्याच्या गजरात व प्रचंड खर्च करून पार पाडले जात होते. त्यामुळे अनेकदा वधू-वर पक्षातील वऱ्हाडी मंडळींत वादाच्या घटना घडल्या होत्या. जळगाव यादव गोल्ला समाज पंच मंडळीने डिसेंबर महिन्यात लग्न, साखरपुडे, देवीपूजा व पतनाम सोहळ्यात डीजे न लावण्याचे आणि सर्व समारंभ सोहळे साध्या वाद्यात पार पाडण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. ध्वनिप्रदूषण रोखणे व प्रचंड खर्च टाळणे हा त्यामागील प्रमुख उद्देश होता. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर समाजांतर्गत दंडात्मक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ध्वनी प्रदूषण व अनिष्ट प्रथांना प्रतिबंध घालणाऱ्या या निर्णयाचे सर्वानी अनुकरण केल्यास ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तन दृष्टिपथास येऊ शकेल.
गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. या मालेतील बावन्नावा लेख.