राष्ट्रीय फ्लोरोसिस प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमातील मर्यादेमुळे राज्यातील फ्लोराईडयुक्त पेयजलाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या अनेक जिल्ह्य़ांकडे दुर्लक्ष झाले असून पाण्याच्या प्रचंड उपशामुळे अनेक भागात पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण घातकरीत्या वाढले आहे. देशातील १९ राज्यांमधील २३० जिल्हे फ्लोरोसिस विकाराने बाधित असल्याचे आढळून आल्यानंतर तीव्रतेनुसार प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रम देशभरात आखण्यात आला. राज्यातील फ्लोरोसिसग्रस्त १२ जिल्ह्य़ांपैकी चंद्रपूर, नांदेड, लातूर, वाशीम, यवतमाळ आणि बीड या सहा जिल्ह्य़ांमध्ये राष्ट्रीय फ्लोरोसिस प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात आला आहे. मात्र, निधी अपुरा पडल्याने या जिल्ह्य़ांमधील समस्या पूर्णपणे सुटू शकलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्लोरोसिस हा विकार प्रामुख्याने अत्याधिक फ्लोराईडयुक्त पाणी पिल्याने होतो. कायमस्वरूपी शारीरिक हानी या विकारात होते. व्यंग स्वरूपात तो आयुष्यभर टिकून राहतो. जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या मानकानुसार पेयजलात फ्लोराईडचे प्रमाण १.५ मिलिग्रॅमपेक्षा जास्त नको. भंडारा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम या विदर्भातील पाच जिल्ह्य़ांसह राज्यातील नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, जळगाव या जिल्ह्य़ांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण काही ठिकाणी तर धोकादायकरीत्या ६ ते ९ मिलिग्रॅमपर्यंत पोहोचल्याचे निदर्शनास आले आहे. अकोला, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्य़ांमध्येही फ्लोराईडयुक्त पेयजलाची समस्या नव्याने आढळून आली आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील २४०, यवतमाळ जिल्ह्य़ातील ४५४ गावांमध्ये हा प्रश्न गंभीर बनला आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील काही गावांमध्ये ‘फ्लोराईड रिमुव्हल युनिट’  बसवण्यात आले, पण निधीअभावी त्याचा प्रसार होऊ शकला नाही. हे संयंत्र बोअरवेलवर बसवल्यानंतर भूजलातील फ्लोराईडचे प्रमाण कमी होते. दुसरीकडे, राष्ट्रीय फ्लोरोसिस नियंत्रण व प्रतिबंध कार्यक्रमाअंतर्गत राज्यात नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्र अण्वेषकांचा कार्यकाळ संपल्यानंतर आरोग्य विभागाने त्यांची पदे रद्द केली. आता हा कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत राबवण्यात येत असल्याची माहिती आहे. मनुष्यबळाअभावी रुग्ण तपासणीपासून ते जल पृथक्करणाचे काम मंदावले आहे. त्याचा परिणाम नियंत्रण आणि प्रतिबंध कार्यक्रमावर झाला आहे. पाणी उपसा वाढल्याने अनेक भागात फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या डोके वर काढू लागल्याने आता नव्याने सर्वेक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे. या पेयजलाच्या समस्येच्या तीव्रतेच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा क्रमांक हा आठवा असला, तरी काही भागात या विकाराने मोठा विळखा घातला आहे. हजारो नागरिक फ्लोरोसिस विकाराने ग्रस्त आहे. शालेय मुलांमध्येही या विकाराचे चिंताजनक प्रमाण आढळून आले आहे. डेंटल फ्लोरोसिसच्या रुग्णांचे दात पिवळे पडतात. अधिक परिणाम झालेल्या रुग्णांना तोंडही पूर्णपणे उघडता येत नाही. स्केलेटल विकारात कायमचे व्यंग निर्माण होते. अनेकांचे हात आणि पाय वाकडे झाले आहेत. पाठीला बाक येतो. अनेक रुग्ण तर काठीच्या आधाराशिवाय चालू शकत नाहीत. या विकारामुळे नैराश्यही बळावत आहे. युवक-युवतींच्या विवाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रथम व्यापक पातळीवर जलस्त्रोतांची तपासणी करणे आवश्यक असून अत्याधिक फ्लोराईड असलेल्या जलस्त्रोतांमधून पाणी पिण्यास पूर्णपणे मज्जाव करावा, त्या भागात पर्यायी शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

More Stories onमराठीMarathi
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water of 12 states in maharashtra dangerous for health
First published on: 05-03-2014 at 11:47 IST