शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात!
जिल्हय़ातील गोदावरी पात्रात असलेल्या बंधाऱ्यांतले पाणी भविष्यात पेटण्याची चिन्हे आहेत. पाण्यावरून सध्या संघर्ष उफाळू लागला आहे. यापूर्वी दिग्रस बंधाऱ्याचे पाणी नांदेडला जाऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. आता मुदगल येथील बंधाऱ्याचे पाणी परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राला देऊ नये, या मागणीसाठी शेतकरी संघर्षांच्या पवित्र्यात आहेत. विशेषत: शिवसेनेने हा प्रश्न ऐरणीवर घेतला आहे.
गोदावरी पात्रात जे ११ बंधारे होऊ घातले, त्यातला सर्वाधिक लाभ परभणी जिल्हय़ास झाला. जिल्हय़ातील तारुगव्हाण, ढालेगाव, मुळी, मुदगल, दिग्रस या ठिकाणी हे बंधारे होत आहेत. कुठे पाणी अडले आहे तर कुठे अद्याप काम पूर्णत्वास जायचे आहे. एकीकडे बंधाऱ्यातले पाणी अन्यत्र जाऊ नये, यासाठी शेतकरी संघर्ष करीत असतानाच ढालेगाव व अन्य ठिकाणी असलेल्या बंधाऱ्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीज खंडित करण्यात आली. दोन्ही बाजूंनी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. ढालेगाव बंधाऱ्यातून जे शेतकरी पूर्वपरवानगीसह पाणी उचलत आहेत, अशा शेतकऱ्यांची वीजजोड तोडू नये, अशी मागणी आमदार मीरा रेंगे यांनी केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही याच स्वरूपाची मागणी केली.
सध्या ढालेगाव असो अथवा मुदगल, या ठिकाणी अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी या पाण्याचा लाभ होत आहे. ढालेगाव येथे अनेक शेतकऱ्यांनी परवानगी घेऊन पाणी उचलले. आता सरकारने भविष्यातल्या टंचाईची स्थिती लक्षात घेता या शेतकऱ्यांची वीज तोडण्याच्या मोहिमा हाती घेतल्या.
भविष्यात पाणीप्रश्न गंभीर आहेच, पण शेतकऱ्यांनीही मोठय़ा कष्टाने गुंतवणूक केली. खरिपाचे बी-बियाणे, खते, कीटकनाशके असा सारा खर्च तसेच पाणी उपशासाठी लागणारा वीजपंपाचा खर्च हे गणित प्रत्येक शेतकऱ्यासाठी हजारो रुपयांच्या घरात जाणारे आहे. आता शेतात पिके दिसू लागली असताना वीज खंडित करण्यात येत असेल तर मग शेतकऱ्यांनी करावे तरी काय, असा प्रश्न पडतो. दुसरीकडे मुदगल येथील बंधाऱ्याच्या पाण्यावरून नवा वाद उपस्थित झाला आहे.
परळी औष्णिक केंद्रासाठी खडका बंधाऱ्यातले पाणी दिले जाते. सध्या केवळ १५ दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. आता मुदगलच्या पाण्यावर परळीच्या केंद्राची भिस्त आहे. पाच दशलक्ष घनमीटर पाणी या बंधाऱ्यातून औष्णिक केंद्रास देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे पाणी कोणत्याही स्थितीत औष्णिक केंद्रास दिले जाऊ नये, यासाठी शेतकरी आक्रमक आहेत. शिवसेनेने यापूर्वीच मुदगल येथे बंधाऱ्यावर मोर्चाच्या रूपाने धडक मारली आहे.
आमदार रेंगे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. शिवाजी दळणर, जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव या सर्वानी हा विषय सध्या गांभीर्याने घेतला आहे. मुदगलच्या बंधाऱ्याचे पाणी परळीच्या औष्णिक केंद्रास सोडणाऱ्यांना पाण्यात बुडवू, अशी भाषा केली जात आहे.
जिल्हय़ाच्या सिंचन क्षेत्रासाठी वरदान ठरले जातील असे बंधारे या तऱ्हेने पाण्याच्या संघर्षांचे नवे केंद्र म्हणून पुढे येत आहे.
सध्याच अनेक ठिकाणी तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई आहे. शेतीसाठी पाणी तर दूरच, परंतु अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय भयावह असे रूप धारण करणारा आहे. जिल्हय़ात मोठे, मध्यम आणि लघु असे सर्वच प्रकल्प तळ गाठण्याच्या स्थितीत आहेत.  अशा वेळी गोदावरी पात्रात बंधाऱ्यामध्ये जे पाणी अडले आहे, ते पाणीही दिवसेंदिवस पेटण्याचीच चिन्हे आहेत.