नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पाणी प्रश्न पाणीटंचाईवरून न पेटता पाण्याची गळती, गैरवापर आणि गैरप्रकार यांच्यावरून पेटण्याची शक्यता निर्माण झाली असून, पाण्याचे ऑडिट सिडकोसारख्या संस्थेकडून करण्याता यावे, अशी मागणी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहयोगी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांनी केली आहे. याच म्हात्रे यांनी पाण्याची गळती आणि गैरवापर याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. म्हात्रे यांना तीन महासभा ही लक्षवेधी सादर करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी अडचणीच्या वेळी क्रॉस वोटिंग करण्याचा इशारा बुधवारी महापौर सुधाकर सोनावणे यांना दिला होता. त्यामुळे गुरुवारी झालेल्या सभेत लक्षवेधी चर्चेला घेण्यात आली होती. त्यात पाण्याचा गैरवापर विरोधकांनी वेशीवर टांगला.नवी मुंबई पालिका क्षेत्रात केवळ १९ टक्के पाणी गळती होत असून इतर पालिकांत हे प्रमाण ३० टक्यांपेक्षा जास्त असल्याचा युक्तिवाद कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी केल्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर काही काळ गदारोळ झाले. विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि सभागृह नेते जयवंत सुतार आमने सामने ठाकले होते. ठाण्याबाबत शिंदे यांनी दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचे शिवसेनेच्या सदस्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबई पालिका २४ तास पाणीपुरवठय़ाचा दावा करीत असली, तरी कोपरखैरण्यापुढे २४ तास पाणीपुरवठा होत नाही. दिघा परिसरात तर पाण्याची टंचाई काही ठिकाणी जाणवत आहे. त्यामुळे पालिकेचा २४ बाय ७चा दावा खोटा असल्याचे लक्षात येत आहे. संपूर्ण शहरात गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा केला जात असताना पारसिक हिलवर करोडो रुपये खर्च करून पंपहाऊस बांधण्याचे कारण काय, असा सवाल या सदस्यांनी केला. गुरुत्वाकर्षणाने पाणीपुरवठा होत असताना पंपहाऊसच्या विद्युत बिलापोटी मागील तीन वर्षांत ५३ कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. त्यामुळे गुरुत्वाकर्षण शक्तीने शहराला पाणीपुरवठा होत असताना वीज बिलापोटी इतकी रक्कम कशी खर्च केली जात आहे. असे अनेक प्रश्न या पाणी प्रश्नाच्या संबंधित पुढे येत असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी विविध स्तरातून केली जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Sep 2015 रोजी प्रकाशित
नवी मुंबईतील पाणी प्रश्न पेटणार
नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पाणी प्रश्न पाणीटंचाईवरून न पेटता पाण्याची गळती, गैरवापर आणि गैरप्रकार यांच्यावरून पेटण्याची शक्यता निर्माण झाली असून...

First published on: 01-09-2015 at 05:22 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water shortage in new mumbai