समुद्रसपाटीपासून अतिउंचावरील अनेक ऐतिहासिक गडांचे स्थापत्यशास्त्र प्रगत होते, असे म्हटले जाते. कारण त्या काळी खोदलेली पाण्याची टाकी बारमाही पाण्याचे मुख्य स्रोत म्हणून वापरली जायची. या पाण्याचा वापर गडावरील वस्ती तर करायचीच, शिवाय गडांच्या पायथ्यांशी असलेल्या गावांनाही त्यातून पाणीपुरवठा होत असे. काळ बदलला आणि गडांवरील जलस्रोतांकडे सर्वानी दुर्लक्ष केले. पावसाने ओढ घेतल्यामुळे यंदा पाणी टंचाईचे संकट उभे राहील अशी भीती असताना मुंबई, ठाण्यातील काही दुर्गवीरांनी गडकोटांवरील जलस्रोत जोपासण्याची एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. हे बारमाही जलस्रोत टिकण्यासाठी ठाणे, मुंबईतील गडदुर्ग प्रेमी जूनच्या सुरुवातीपासून गडावरील पाण्याच्या टाक्यांच्या स्वच्छतेच्या मोहिमा हाती घेऊ लागले आहेत. या उपक्रमाअंतर्गत दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने रविवारी कर्जतजवळील भिवगडावरील पाण्याच्या विहिरी स्वच्छ करण्यात आल्या.
कर्जतजवळचा ‘वदप’ धबधबा प्रसिद्ध असून पावसाळ्यामध्ये पर्यटकांची मोठी झुंबड या धबधब्यावर उडते. पावसाळ्यात धुवाधार पाऊस असला तरी या भागातील गावांमध्ये उन्हाळ्यामध्ये मात्र अत्यंत वेगळी परिस्थिती असून पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येथील ग्रामस्थांना ओढवते. याच परिसरामध्ये ‘भिवगड’ हा किल्ला असून लोकांकडून दुर्लक्षित झालेला असून या किल्ल्याचा इतिहास पुरेसा प्रचलित नाही. तरीही या किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या विहिरींचा या भागातील गावांना आधार असतो. गडावरील विहिरीतून पाइपच्या साहाय्याने पाणी खेचून त्याचा वापर केला जातो. पूर्वी बाराही महिने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी काही वर्षांपासून लवकर आटू लागल्यामुळे या गावांना पाण्यासाठी आता टँकरचा पर्याय उरला आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानचे तरुण दुर्गवीर वेगवेगळ्या दुर्गाचा अभ्यास करण्यासाठी या भागात गेले असता त्यांना या गावक ऱ्यांची परिस्थिती लक्षात आली. या ग्रामस्थांच्या मदतीसाठी टाक्यातील पाणी वर्षभर पुरवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय करण्यात आला. रविवारी या उपक्रमातील पहिली मोहीम दुर्गवीर प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी आयोजित करून या भागातील एका मोठय़ा पाण्याच्या टाक्यातील गाळ साफ केला. तसेच या किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी खिंडीतून जाण्याचा मार्ग बंद झाला होता तो मार्ग मोकळा करण्यासाठी या स्वयंसेवकांनी प्रयत्न केला. ही अवघड वाट पूर्णपणे मोकळी करण्यासाठी आणखी श्रमदानाची गरज असून मुंबईतील काही दुर्गप्रेमी पुढील महिन्यात होणाऱ्या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत.
गडाला गतवैभव मिळण्यासाठी प्रयत्न..
उभ्या कातळावर कोरलेल्या पायऱ्या, गडावरील गुहा यावरून या गडाच्या प्राचीनतेचा अंदाज करता येत असून या गडावर तीनहून अधिक पाणीटाके असून ते नामशेष होण्याच्या मार्गवर आहेत. गडावरील एक टाके ‘गोरकामत’ गावाला बारमाही पाणीपुरवठा करत होते. गडावरील जलस्रोत टिकावे आणि त्याचा वापर गावातील लोकांना व्हावे यासाठी संस्थेच्या वतीने महिन्यातून तीन मोहिमा संस्थेच्या वतीने पुढील वर्षभर राबवण्यात येणार आहेत. या गडाला त्याची पूर्वीची ओळख पुन्हा प्राप्त व्हावी यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान प्रयत्न करणार आहे, अशी माहिती दुर्गवीरचे संतोष हसुरकर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water sources sanitation
First published on: 02-07-2014 at 10:03 IST