नागपूर विभागात रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याचा वापर होत असल्याने मध्यम व लघु प्रकल्पांच्या जलसाठय़ात झपाटय़ाने घट होत असल्याने उन्हाळ्यातील जलसंकटाची चाहूल लागली आहे. परिणामी विभागात चिंतेचे वातावरण आहे. या प्रकल्पांतील जलसाठा दोन आठवडय़ात चार टक्क्याने घटला असून आता केवळ ३६ टक्के जलसाठा राहिला आहे. विभागातील मोठय़ा प्रकल्पांची स्थिती मात्र चांगली आहे. या प्रकल्पांतील जलसाठा पंधरवडय़ात केवळ दोन टक्क्याने घटला असून आता ५५ टक्के आहे.
विभागात दोन आठवडय़ापूर्वी मोठय़ा प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठी १६५४ द.ल.घ.मी. होता. या आठवडय़ात प्राप्त झालेल्या आकडेवाडीनुसार या प्रकल्पात आता १५९१ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठी आहे. दोन आठवडय़ात मोठय़ा प्रकल्पांच्या जलसाठय़ात विशेष घट झाली नाही, हे आशादायक चित्र आहे. जलसाठय़ांची पातळी चांगली कायम राहिली तर उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या मोठय़ा प्रमाणात भेडसावणार नाही. पण मध्यम व लघु प्रकल्पांची जलपातळी झपाटय़ाने खालावत असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करून पिण्यासाठी पाणी पुरवावे लागणार आहे.
नागपूर विभागात अठरा मोठे प्रकल्प आहेत. यामध्ये  गोसीखुर्द, तोतलाडोह, इटियाडोह, सिरपूर, धाम, लोअर वर्धा, कामठी खैरी, वडगाव व बोर या प्रकल्पांतील जलसाठय़ांची पातळी चांगली आहे. महाजनकोच्या इरई धरणात यंदा ८० टक्के जलसाठा आहे. यामुळे चंद्रपूरच्या वीज निर्मिती केंद्राला पाणी कमी पडणार नाही, अशी स्थिती आहे. विभागातील बावनथडी, रामटेक, लोअर नांद, असोलामेंढा, पूजारी टोला, पोथरा या प्रकल्पांमधील साठा मात्र ३० टक्क्यांच्या खालीच आहे.
विभागात ४० मध्यम व ३१० लघु प्रकल्प आहेत. गेल्या पंधरवडय़ात मध्यम प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा २३८ द.ल.घ.मी. तर लघु प्रकल्पांमध्ये २०५ द.ल.घ.मी. होता. तो आता अनुक्रमे २०६ व १७१ द.ल.घ.मी. राहिला आहे. मध्यम व लघु प्रकल्पांतील जलसाठय़ाचा सिंचनासाठी वापर होत असल्याने झपाटय़ाने घट होत आहे.