बुलढाणा जिल्हा सांस्कृतिक आघाडीच्या वतीने बुलढाणा तालुक्यातील वीस दुष्काळग्रस्त गावांसाठी दीड हजार लिटरच्या सिंटेक्स टाक्यांचे वितरण जिल्हाधिकारी कि रण कुरूंदकर यांच्या हस्ते तहसील कार्यालयात करण्यात आले.
बुलढाणा तालुक्यातील दुष्काळग्रस्तांसाठी मदत निधी उभारण्यासाठी बुलढाणा जिल्हा सांस्कृतिक आघाडीच्या वतीने महाराष्ट्राची स्वरमाला हा राहुल सक्सेना आणि आरती भिसे यांच्या गायनाच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाद्वारे उभ्या राहिलेल्या निधीतून बुलढाणा तालुक्यातील वीस दुष्काळग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी साईजल कंपनीच्या दीड हजार लिटरच्या वीस टाक्या उपलब्ध करून देण्यात आल्या.
तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांच्या हस्ते तहसीलदार दिनेश गीते यांच्याकडे बुलढाणा जिल्हा सांस्कृतिक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाण्याच्या टाक्या सुपूर्त करण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसहभागाच्या सहकार्यातून प्रशासनाला ही फार मोठी मदत असल्याची भावना व्यक्त केली. सुरुवातीला बुलढाणा जिल्हा सांस्कृतिक आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ज्या वाडीवस्तीतील विहिरींमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे, अशा वीस गावांमध्ये या भेट दिलेल्या टाक्या बसविण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार गीते यांनी याप्रसंगी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुलढाणा जिल्हा सांस्कृतिक आघाडीचे समन्वयक नरेंद्र लांजेवार यांनी केल्यानंतर जिल्ह्य़ातील अनेकांनी या विधायक उपक्रमास सहकार्य केल्याची माहिती सांस्कृतिक आघाडीच्या प्रमुख मिनल आंबेकर यांनी दिली. टाकी हस्तांतरण कार्यक्रमप्रसंगी डॉ. गणेश गायकवाड, राम बारोटे, ना. है. पठाण, नवनिता चव्हाण, शाहिणा पठाण, प्रा. संतोष आंबेकर, प्रा.अनंत सिरसाठ, प्रा. सुनील देशमुख, प्रा.संजय आराख, प्रा.संतोष वानखेडे आदी सांस्कृतिक आघाडीचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी चंद्रशेखर केणे, डॉ.गजानन पडघान, अ‍ॅड. दीपक पाटील, गौरी शिंगणे, प्रा. इंदू लहाने यांनी सहकार्य केले.