मॉडेल मिलच्या जागेवर गोदरेज आनंदमतर्फे उभारण्यात येत असलेल्या सदनिकेच्या ठिकाणी कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीची भिंत कोसळल्याने त्यात दोन मजुरांचा जागीच मृत्यू, तर दोन गंभीर जखमी झाले. जखमींना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.      
इस्लाम शेख (४५) आणि रुबेल शेख (२०) अशी मृतांची नावे असून दोघेही पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादचे राहणारे आहेत. इस्लाम शेख दोन वर्षांपासून, तर रुबेल तीन महिन्यांपूर्वी या ठिकाणी कामाला आला होता. या घटनेमुळे कामगारांमध्ये शोककळा पसरली असून त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह पाहून हंबरडा फोडला. शेख इस्माईलची पत्नी सानुबारा, मुलगी सागोरा आणि मुलगा माफिक तिघेही या परिसरात काम करीत होते. रुबेलचे नातेवाईक या ठिकाणी राहत होते.  मॉडेल मिलच्या जागेवर गोदरेज आनंदम वर्ल्ड सिटीतर्फे गेल्या दोन-तीन वर्षांंपासून सदनिका उभारण्याचे काम सुरू असून या ठिकाणी बिहार आणि पश्चिम बंगालमधील हजारो मजूर दिवस रात्रंदिवस काम करीत असल्यामुळे त्यांची राहण्याची व्यवस्था सदनिका उभारण्यात येत असलेल्या परिसरात करण्यात आली आहे. अनेक कामगार कुटुंबासह या ठिकाणी आले आहेत. कामगारांसाठी परिसरात पाच-सहा दिवसांपूर्वी सिमेंटची १ हजार लिटर पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. मंगळवारी या टाकीत टॅंकरने पाणी भरण्यात आले होते. नेहमीप्रमाणे आज सकाळी काही मजूर कपडे धुण्यासाठी, तर काही आंघोळीसाठी आले होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास इस्माईल शेख, रुबेल आणि अन्य दोघे सहकारी टाकीजवळ कपडे धूत असताना अचानक टाकीची भिंत कोसळल्याने धावपळ उडाली. आजूबाजूला काम करणारे मजूर धावले. इस्माईल आणि रुबेल अतिशय विचित्र अवस्थेत ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी कामगारांना बरीच कसरत करावी लागली. मन्सुर शेख व असगर हे दोघे कामगार या घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ मेडिकलमध्ये हलविण्यात आले. घटनेच्या वेळी २५ ते ३० कामगार टाकीजवळ कोणी कपडे धुण्यासाठी, तर काही आंघोळीसाठी उभे होते, मात्र त्या ठिकाणी तीन नळ असल्याने गर्दी न करता सर्व बाजूलाच उभे होते. दरम्यान, या घटनेची माहिती गणेशपेठ पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी इस्माईल आणि रुबेल यांचे मृतदेह मेडिकलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविले. ही पाण्याची टाकी उभारण्याचे कंत्राट बिहारच्या श्रीराम संदीप रॉय यांच्याकडे होते. त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. गोदरेज आनंदमचे अधिकारी घटनास्थळी आल्यावर काही कामगारांनी मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली.