उल्हास नदीतील पाणीसाठा खालावल्याने कल्याण डोंबिवली शहरात पाणी कपात लागू झाल्याने कल्याण पुर्वेतील पाणी टंचाईग्रस्त नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मागील दोन वर्षांपासून या भागात अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. या पाश्र्वभूमीवर आठवडय़ातील दोन दिवस पाणी कपात लागून झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका कल्याण पुर्वेतील रहिवाशांना बसणार आहे.
कल्याणमधील पुर्व भागाला महापालिकेकडून ४० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात या भागातील नागरी वसाहतींना जेमतेम १५ ते २० दशलक्ष लिटर पाणी मिळते. त्यामुळे आधीच या भागात पाण्याचा पुरवठा कमी असताना कपात लागू झाल्याने आणखी गंभीर परिस्थीती निर्माण होईल, अशी भीती या भागातील नगरसेवकांनी व्यक्त केली. कल्याण पूर्व भागात महापालिकेचे जवळपास २५ प्रभाग आहेत. मागील दोन वर्षांपासून या प्रभागांमधील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही, अशा तक्रारी आहे. महापालिकेतील अनेक सभा येथील पाणी टंचाई या विषयावर गाजल्या आहेत. गेल्या वर्षांपासून कल्याण पूर्वेतील पाणी प्रश्नावर महापालिकेत काही नगरसेवकांकडून सातत्याने आवाज उठविण्यात येत आहे. पण, तेवढय़ापुरती मलमपट्टी करून पालिका अधिकारी वेळ मारुन नेतात, अशी टिका काही नगरसेवकांनी वृत्तान्तशी बोलताना केली. कल्याण पूर्व भागात सुमारे ४० हजार कुटुबांना अनधिकृतपणे पाण्याचा पुरवठा होतो, अशी विश्वसनिय माहीती आहे. यासंबंधीचे पुरावे मध्यंतरी याठिकाणचे नगरसेवक कैलास शिंदे यांनी महासभेत सादर केले होते. आवश्यकतेपेक्षा कमी पाणी पुरवठा होत असल्याने कल्याण पुर्व भागात सुमारे २० दक्षलक्ष लिटर पाण्याचा दररोज तुटवडा असतो, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सुत्रांनी दिली.  पाणी पुरत नसल्याने नागरिक बुस्टर लावून पाणी खेचतात. त्यामुळे पाणी टंचाई आणखी वाढते. वाढीव पाणी देण्यासाठी प्रशासन काहीही करीत नसल्याचे नगरसेवक सचिन पोटे यांनी सांगितले.
नवी मुंबईच्या कोटय़ातील ४० दशलक्ष लिटर पाणी कल्याण पालिकेला मिळाले तरी, कल्याण पूर्व भागाचा पाणी टंचाईचा प्रश्न सुटु शकतो. परंतु, महापालिका अधिकाऱ्यांची उदासिनता, त्यांचा एमआयडीसी, मंत्रालय पातळीवर नसलेला पाठपुरावा. त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे. प्रशासनाच्या नाकार्तेपणामुळे टंचाईसदृश्य परिस्थीती निर्माण झाली असून आम्ही नागरिकांना काय उत्तरे द्यायची असा प्रश्न नगरसेवक पोटे यांनी केला. नगरसेविका माधुरी काळे, कल्याणी पाटील यांनीही गेले वर्षभर आपण पालिकेत या पाणी टंचाई प्रकरणी आवाज उठवित आहोत, परंतु प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नाही, असा आरोप केला. डोंबिवली पश्चिमेत कुंभारखाणपाडा, महाराष्ट्रनगर, गरीबाचापाडा, देवीचापाडा, रेतीबंदर, आयरेगाव परिसरात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत चाळी, इमारती उभी करण्याची कामे सुरू आहेत. या बांधकामांना आणि तेथे राहण्यास येणाऱ्या नागरिकांना पालिकेच्या जलवाहिन्यांवरून चोरून नळ जोडण्या दिल्या जात आहेत. ही कामे दिवसाढवळ्या सुरू आहेत.