रात्री बारा वाजेच्या सुमारास येशु ख्रिस्ताच्या जन्मावेळी सामूहिक प्रार्थना.. मंगळवारी सकाळी प्रार्थनेबरोबर धर्मगुरूंकडून मार्गदर्शन .. केकचे वाटप.. शुभेच्छांचा वर्षांव.. आणि घरी येण्याचे निमंत्रण.. अशा वातावरणात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात नाताळ सणास उत्साहात प्रारंभ झाला. या निमित्त ठिकठिकाणचे चर्च आकर्षक रोषणाईने उजळून निघाले आहेत.
मंगळवारी रात्री घडय़ाळाचा काटा बारावर गेला आणि सर्वत्र येशु ख्रिस्ताच्या जन्माचे स्वागत सुरू झाले. शरणपूर रस्त्यावरील संत आंद्रीया चर्च, त्र्यंबक नाका चौकातील होलीक्रॉस चर्च, नाशिकरोड येथील सेंट झेवियर्स चर्च, जेलरोडवरील संत अ‍ॅना, देवळाली कॅम्पस्थित सेंट पॅट्रीक चर्च, आदी ठिकाणी सामूहिक प्रार्थनेद्वारे भाविकांनी हा जन्मोत्सव साजरा केला. या पाश्र्वभूमीवर, सर्वच चर्च व घराघरांत ख्रिस्त जन्माचे आकर्षक देखावे साकारण्यात आले आहे. नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा सण असला तरी सर्व घटकांनी एकत्र येऊन तो उत्साहात साजरा केला. मध्यरात्रीपासून नाताळच्या शुभेच्छांचा वर्षांव होऊ लागला. भ्रमणध्वनीवरील लघुसंदेशांचाही त्यात समावेश होता. नाशिकरोड व शरणपूर रोड भागातील ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मंगळवारी सकाळी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी धर्मगुरूंचे प्रवचन झाले. केकचे वाटप करण्यात आले. ख्रिश्चन बांधवांनी परस्परांना घरी येण्याचे आवतण दिले.
नाताळनिमित्त सलग दहा दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शरणपूर रस्त्यावरील संत आंद्रीया चर्चमध्ये २९ व ३० डिसेंबर रोजी धार्मिक गीतांच्या कार्यक्रम होणार आहे. बहुतांश चर्चमध्ये आनंद मेळा, वेशभूषा स्पर्धा, क्रीडा स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येशू जन्मानिमित्त म्युझिकल लाईटिंग, ख्रिसमस ट्रीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या देखाव्यांमुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.