पाश्चिमात्यांचे अंधानुकरण थांबवा, अन्यथा येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही, असे मत ज्येष्ठ समाजसेविका दुर्गाताई कानगो यांनी व्यक्त केले. लोकशिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवनिमित्ताने लोकांच्या शाळेत आयोजित स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण उपाख्य प्रभू देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. वि.स. जोग, कार्यवाह मनोहर ढोक, श्रुती अर्काटकर, नागपूरच्या पहिल्या महिला भौतिकोपचार तज्ज्ञ डॉ. निशा कुळकर्णी आदी याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. दुर्गाताई कानगो यांनी यावेळी कुटुंबाचा अर्थ समजावून सांगितला. एम- फादर, ए- अँड, एम- मदर, आय- माय सेल्फ, एल- लव्ह, वाय- यू, म्हणजेट ‘फादर अँड मदर आय लव्ह यू’ असा फॅमिलीचा अर्थ असून तो सर्वानी लक्षात ठेवावा, असे त्या म्हणाल्या. दूरचित्रवाणीवरील सासू-सुनेच्या वादावर त्यांनी चिंता व्यक्त केली. वस्तुत: महिला म्हणजे मधुर, हिंमत आणि लाज अशा तिन्ही गुणांनी युक्त असलेली स्त्री असते. मात्र, आता महिलांनी मधुरतेने बोलणेच संपविले असल्याचे त्या म्हणाल्या.
बाजारू शिक्षण व्यवस्था देशासाठी घातक असल्याचे मत प्रभू देशपांडे यांनी व्यक्त केले. बाजारू शिक्षणव्यवस्थेत तयार झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनात तुम्ही देशभक्ती जागृत करू शकत नाही. परिणामी ते परीक्षात्मक स्थितीतच कार्यरत असतात. पर्यायाने त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळत नाही अन् संशोधन वृत्तीसुद्धा खुंटून जाते, असे ते म्हणाले.
डॉ. निशा कुळकर्णी, विजया जोशी, अमरावतीच्या सहायक पोलीस निरीक्षक कविता इसारकर व मोहन देशपांडे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन अमृता गोखले- भुस्कुटे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे अनेक आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.