दुष्काळी जालना जिल्हय़ास बुलढाणा जिल्हय़ातील खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी औरंगाबादेत केली. परंतु या घोषणेत नवीन काहीच नसून, यापूर्वीच पाणीटंचाई निवारण करण्यासाठी प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावाचाच तो भाग असल्याचे सांगण्यात येते.
मराठवाडय़ातील जिल्हय़ांच्या वार्षिक योजना आराखडा बैठकीसाठी आले असता पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. जालन्यातील पाणीटंचाई निवारणास सरकारने काही नवीन निर्णय घेतल्याचा आभास यामुळे निर्माण झाला. वस्तुत: या संदर्भातील चर्चा जिल्हापातळीवरील बैठकांमध्ये यापूर्वीच होऊन त्या अनुषंगाने चर्चाही झाली आहे. खडकपूर्णा धरण बुलढाणा जिल्हय़ात असले, तरी ते जालन्याच्या सीमेपासून जवळ आहे. जालना जिल्हय़ातील जाफराबाद तालुक्याच्या गावापासून १२ ते १५ किलोमीटर अंतरावरील या धरणामुळे ५६ गावे बाधित झाली. पैकी १२ गावे जालना जिल्हय़ातील आहेत. जाफराबाद तालुक्यातील पूर्णा, धामणा व केळणा नद्यांचे पाणी खडकपूर्णा धरणात जाते. या धरणातील सिंचनाचा लाभ बुलढाण्यास होत असला, तरी त्यात जालन्यातील शेकडो एकर शेतजमीन व १२ गावे बाधित झाली आहेत. या धरणाचे बॅकवॉटर जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी गावापर्यंत आहे.खडकपूर्णा धरणातून जालन्याच्या जाफराबाद व भोकरदन तालुक्यांतील काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन महिना-दीड महिन्यापूर्वीचेच आहे. गेल्या ६ जानेवारीला पाणीटंचाई उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणा व लोकप्रतिनिधींची बैठक भोकरदन, जाफराबाद तालुक्यांच्या ठिकाणी घेतली. या तालुक्यांतील काही गावांना खडकपूर्णा धरणातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यासाठी तात्पुरता जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, खडकपूर्णा जलाशयाच्या बॅकवॉटरजवळील विहिरीतून जालना जिल्हय़ात कुंभारझरी परिसरातील अनेक गावांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या दररोज जवळपास २५ टँकर या ठिकाणी दररोज भरले जातात व त्यांच्या फेऱ्या होतात, असे समजते.