शहरातील नागसेनवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीडशे एकर जमीन विकत घेऊन अविकसित भागात शिक्षण केंद्रे उभी केली. याच परिसरातील नंदनवन कॉलनी ते डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय दरम्यानच्या रस्त्याचे काम करण्यासाठी आंदोलन केले जात आहे. एकीकडे इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला मिळावी म्हणून आंदोलन केले जात आहे, तर दुसरीकडे बाबासाहेबांचे नाव असलेल्या विधी महाविद्यालयाची तोडफोड करण्यासाठी आंदोलन होत आहे, याचा आंबेडकरी जनतेने काय अर्थ घ्यावा, असा सवाल पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. आर. ए. वावरे, डॉ. एल. बी. वाघमारे यांनी केला.
नागसेनवन परिसरात दलित व मागासवर्गीय समाजासाठी शिक्षणाची दारे खुली व्हावीत, म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, पी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालय अशा वेगवेगळय़ा शैक्षणिक संस्था व वसतिगृहे उभारण्यात आली. ही सर्व शिक्षण केंद्रे डॉ. आंबेडकरांची एका अर्थाने स्मारकेच आहेत.
या परिसरात अनेक वसाहती झाल्या आहेत. त्यामुळे स्वाभाविकच नंदनवन कॉलनी आणि इतर वसाहतीतील रहिवाशांना लिटल फ्लॉवर शाळेजवळून व ईदगाह मैदानाजवळून दोन रस्ते आहेत.
 बाबासाहेबांनी विकत घेतलेल्या जमिनीतून कब्रस्तानाला लागून ५० फुटी रस्ता करण्यात यावा, म्हणून आंदोलन केले जात आहे. तसे निवेदनही महापालिका आयुक्तांना दिले आहे. वास्तविक, या भागातून रस्ता नेण्यास प्रतिबंध केला जावा, अशी मागणी अनेकांनी केली आहे. ही जागा आंबेडकरी अनुयायांचे श्रद्धास्थान असून, या पूर्वी महापालिकेने रस्ते केले. मात्र, त्याचा कोणताही मोबदला पीपल्स एज्युकेशन सोसायटीने महापालिकेकडून घेतला नाही. कारण त्यामुळे बाबासाहेबांच्या कोणत्याही संस्थेला धक्का लागला नव्हता.
नंदनवन कॉलनी ते विधी महाविद्यालय या रस्त्याचे संरक्षण व्हावे, या हेतूने महापालिकेनेही काम हाती घेतले नव्हते. मात्र, काहींनी जाणीवपूर्वक लोकभावना चेतवण्यास प्रारंभ केला आहे. डॉ. आंबेडकर यांनी खरेदी केलेल्या जागेची नासधूस होणार नाही, याकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावे व लिटल फ्लॉवर स्कूलजवळून जाणारा रस्ता व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या जवळून जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी डॉ. पानतावणे यांनी केली.