गोंदिया नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम १५ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आला होता, मात्र या दिवशी सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज स्वत: उमेदवारांनी न भरता त्यांच्या गटनेत्यांनी भरले. पीठासीन अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेऊन निवडणूक प्रक्रिया रद्द केली होती. याला आता जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी लोटूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे ही निवडणूक आता केव्हा होणार , असा प्रश्न विचारला जात आहे.
स्थानिक नगर परिषदेत सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी व गोंदिया लोकतांत्रिक काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यांना सत्तारूढ होऊन एक वर्षांचा कार्यकाळ झाल्याने १५ फेब्रुवारीला विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी व सदस्यपदासाठी निवडणूक ठेवण्यात आली होती. पीठासीन अधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. सभापतीपदाकरिता स्वत: उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे होते, मात्र दोन्ही गटनेत्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले होते. यावर पीठासीन अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेऊन तसेच २८ डिसेंबर २००६ च्या जी.आर.नुसार स्वत: उमेदवारांनीच अर्ज भरून दाखल करणे गरजेचे आहे. या जी.आर.पूर्वी स्वत: उमेदवार किंवा त्याचे सूचक किंवा अनुमोदक यांनी अर्ज दाखल केले तरी ते ग्राह्य धरले जात होते, मात्र नवीन नियमानुसार उमेदवारांनी अर्ज दाखल केले नव्हते. त्यामुळे सर्व उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवड १५ फेब्रुवारीला होऊ शकली नव्हती. पीठासीन अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून सभापतीपदाचा पुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक घेण्यात येईल, असे सांगितले होते. याला आता १५ दिवसांचा कालावधी लोटला, मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही.