कारवाई केवळ दाखवण्यापुरती..
तुम्हाला नागपूर शहरात फिरायचे आहे? वाहन शहराबाहेर ठेवून पायी या.. भाजी बाजारात जायचे असेल, तर वाहन आणू नका.. बेशिस्त वाहतूक आणि अतिक्रमणांमुळे नागपूर शहरात फिरता येण्याजोगी स्थिती राहिलेली नाही. यात सुधारणा होण्याची शक्यता नाही. अधूनमधून थोडीफार शिस्त आणण्याचा प्रयत्न होतो, परंतु ती कारवाई थातूरमातूर असते. वाहतूक पोलीस मारल्यासारखे करतात आणि वाहनचालक, रिक्षाचालक, फेरीवाले रडल्यासारखे करतात. डायऱ्या भरतात, दंड होतो. पुन्हा बेकायदा वाहतूक करण्यास मोकळे!
जनतेने जर ठरवले, तर हा प्रश्न सुटेल. मात्र, त्यासाठी स्वयंशिस्तीचा धडा गिरवायला हवा. म्हणजे पोलीस आणि संबंधित यंत्रणेशी तुम्हाला भांडता येईल. नागपूर शहर सर्व दिशांनी वाढू लागले आहेत. बाजारपेठाही आडव्या-तिडव्या पसरत आहेत. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढते आहे. बेशिस्त वाहनांना आवर घालण्यास वाहतूक पोलीस कमी पडत आहेत. इतवारी, बर्डी, महाल, नंदनवन, सक्करदरा, गोकुळपेठ, धरमपेठ, रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात कमालीची बेशिस्त वाहतूक सुरू असते. त्यात प्रामुख्याने ऑटो, स्टार बसेस, सायकल रिक्षांचा समावेश आहे. नागपूरचे रिक्षावाले ‘कट’ मारण्यासाठी बदनाम आहेत. रिक्षात प्रवाशांना कोंबून मोठय़ा आवाजात टेपवर गाणे लावून रिक्षावाले पळत असतात. प्रवाशांना दमबाजी, लुटण्याचा प्रकारही होतो. बसस्थानक परिसरात ऑटो आणि सायकल रिक्षा आडव्या-तिडव्या लावलेल्या असतात. बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचाही सुळसुळाट तेथे वाढला आहे. फुले मार्केट, सक्करदरा बाजार, महालातील बुधवार बाजार आणि बाजार समितीमध्ये शेतीमाल घेऊन येणाऱ्या ट्रक्समुळे रेल्वे आणि बसस्थानक रस्त्यावर फेरीवाल्यांमुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी झालेली असते. हा प्रश्न कधी सुटणार हे कोणालाच माहीत नाही! या कोंडीचे लोण शहरात पसरते आहे. बर्डी, गोकुळपेठ, सदर, इतवारी, गांधीबाग, रामदासपेठ, धंतोली या वर्दळीच्याच ठिकाणी नव्हे तर चौकाचौकात, प्रसिद्ध मंदिराच्या ठिकाणीही, सभागृहे, मंगल कार्यालय, शासकीय कार्यालयाच्या परिसरात सुद्धा वाहनांची इतकी कोंडी झालेली असते की चालणाऱ्यांना रस्ता शोधावा लागतो. शहरात सीताबर्डी भागात असलेल्या बिग बाजारसमोर पार्किंग झोन तयार करण्यात आला आहे. मात्र, झोनमध्ये कमी आणि बाजार परिसरात अनेक वाहने उभी असतात. शिवाय रामदासपेठ परिसरात हॉस्पिटल आणि हॉटेलची संख्या भरपूर आहे. त्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी वाहने लावली जात असल्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णालयांपर्यंत पोहचण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बेशिस्त वाहतुकीबरोबरच मुख्य रस्त्याने कंटनेर, क्रेन यासारखी अवजड वाहने दिवस-रात्र पळत असतात. या वाहनांमुळे कितीतरी अपघात झाले आहेत. अनेकांचे प्राण गेले आहेत. शहराच्या अनेक चौकात अजूनही सिग्नल नाहीत. ते तातडीने बसवण्याची गरज आहे. बहुतांश ठिकाणी दुकानदारांनी रस्त्यावर लावलेले सामान, हातगाडय़ा, फळविक्रेते यांचा गराडा असतो. सीताबर्डी, महाराजबाग रोड आणि केळीबाग रोडचा अर्धा भाग छोटे विक्रेत्यांनी व्यापला आहे. महापालिकेच्या अतिक्र मण विभागाची कारवाई शहराच्या वेगवेगळ्या भागात रोज सुरू असली तरी ती परिणामकारक नाही. कारवाई झाली आणि अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणाहून गेले की पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When there will be the traffic discipline
First published on: 18-02-2014 at 08:49 IST