काही महिन्यांपूर्वी सेवाग्राम येथील महात्मा गांधींचे वास्तव्य असलेल्या बापू कुटीला उधईने ग्रासल्याची घटना सर्वश्रुत असतानाच कुटीच्या सौंदर्यीकरणासंबंधीचा प्रश्न जयप्रकाश छाजेड यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.
बापूकुटीमध्ये महात्मा गांधींनी १३ वर्षे वास्तव्य केले. या घटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरची स्थापना करावी, अशी मागणी छाजेड यांनी केली. त्यावर ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील यांनी उत्तर देताना केलेल्या कामांची माहिती  दिली.
त्यात सेवाग्राम येथील उगले          ले-आऊट ते शेताकडील रस्त्याचे बांधकाम, सेवाग्राम येथे नाली व पेव्हिंग ब्लॉकचे बांधकाम झाले असून बापुकुटीच्या बाहेर कुंपण बांधण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, त्यावर आक्षेप नोंदवत, असे कुठलेही सौंदर्यीकरण न झाल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले. सौंदर्यीकरणाचे काम स्वत: ट्रस्ट बघते असे सांगून छाजेड यांच्या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरची राज्य शासनाची भूमिका राहील, असे पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र, शोभा फडणवीस यांनी बापू कुटीत लागलेल्या उधईची कल्पना सभागृहाला दिली. त्यावर कुटीची दुरुस्ती केली जाईल, एवढी माफक प्रतिक्रिया सतेज पाटील यांची होती.