जीवनाचा अविभाज्य घटक असणाऱ्या पाण्याची जन्मकथा, ते मिळविण्यासाठी करावे लागणारे भगीरथ प्रयत्न, पाण्याचा विवेकपूर्ण वापर न केल्यास ओढवणारी संभाव्य आपत्ती, विविध भाषांमधील पाण्याची नावे, म्हणी, वाक् प्रचार आणि गाणी असे माहितीपूर्ण मनोरंजन करणारी ‘पानी पानी रे’ ही एक अविस्मरणीय मैफल ‘इंद्रधनु’च्या वतीने शनिवारी रात्री गडकरी रंगायतनमध्ये सादर करण्यात आली. या मैफलीच्या अखेरीस पाण्याचा जपून वापर करण्याबाबतची सामूहिक प्रतिज्ञा घेऊन ठाणेकर जलसंवर्धनाचा वसा आपापल्या घरी घेऊन गेले.
 मल्हार रागातील सुश्राव्य बंदिशीने सुरू झालेल्या या मैफलीत कल्याणी साळुंके आणि धनंजय म्हैसकर यांनी छोटी सी कहानी से, पानी पानी रे, नभ उतरू आलं, काले मेघा काले मेघा, रिमझिम गिरे सावन आदी गाणी सादर केली. सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी त्सुनामीविषयी लिहिलेले त्यांचे ‘ऐसा तेरा करम हुआ, साहिल सारे बहने लगे’ हे गीत सादर केले.
या वेळी ठाणे जिल्ह्य़ात जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी हेमंत जगताप, प्रगती प्रतिष्ठानच्या सुनंदा पटवर्धन, पर्यावरण दक्षता मंचचे विद्याधार वालावलकर आणि उपवनसंरक्षक किशोर ठाकरे यांचा ‘इंद्रधनु’च्या वतीने सत्कार करण्यात आला. पृथ्वीवर पाणी नेमके कधी आणि कसे निर्माण झाले, २६ जुलै २००५ रोजी मुंबईत तसेच गेल्या वर्षी उत्तराखंडात जलप्रकोपामुळे उडालेल्या हाहाकार आदी ध्वनिचित्रफिती लक्षवेधी ठरल्या. निकिता भागवत आणि अमुल पंडित यांच्या खुमासदार निवेदनाने मैफलीत रंग भरले. अनंत जोशी यांनी संगीतसंयोजन तर ‘इंद्रधनु’चे अजित परांजपे यांनी आभार मानले. ‘इंद्रधनु’ने शाळा-महाविद्यालयांमधून हा कार्यक्रम सादर करावा, अशी अपेक्षा उपस्थित रसिक प्रेक्षकांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onठाणेThane
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will use water carefully
First published on: 29-07-2014 at 06:00 IST