उच्च दाबाच्या वीज वाहिनीला धक्का लागून रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वायरमनचा मृत्यू झाला. सुरेश मसाजी लोहार (वय 30 रा. कौलव) असे त्याचे नाव आहे. सुमारे दोन तासाहून अधिक काळ मध्यरात्रीच्यावेळी मृतदेह तारेवर तसाच होता. यामुळे संतप्त झालेल्या तेथील तरुणांनी उमा चित्रपटगृहाजवळील महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. महावितरणने दाखविलेल्या हलगर्जीपणाबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. लोहार याच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी, मगच मृतदेह खाली घ्यावा, अशी मागणी केल्याने वाद चिघळत गेला.
आझाद गल्ली येथे विद्युत यंत्रणेत दोष निर्माण झाला होता. त्याच्या दुरुस्तीसाठी लोहारसह तिघे कर्मचारी तेथे आले होते. वीज पुरवठा बंद न करताच त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना विजेच्या खांबावर चढण्यास सांगितले होते. तुटलेली वायर जोडत असताना उच्च दाबाच्या विजेला लोहार याचा स्पर्श झाला. काही क्षणातच त्याला मृत्यूने वेढले. पकडीसह मृतदेह तारेवर तसाच लटकत होता. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यावर नागरिकांनी वीज पुरवठा खंडित केला. घटनास्थळी अग्निशामक दलाचे दोन बंब आले होते. पण वीज पुरवठा बंद असल्याची खात्री केल्याशिवाय मृतदेह काढता येणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.
घटनास्थळी विद्युत मंडळाच्या कंत्राटी वायरमनचा मृत्यू झाला तरी त्याठिकाणी एकही अधिकारी वा कर्मचारी आला नव्हता. उलट अधिकाऱ्याच्या बेपर्वाईमुळे वायरमनचा मृत्यू झाला असा आरोप लोहार यांच्या कुटुंबीयांनी केला. कुटुंबाची जबाबदारी वीज मंडळाने घेतल्याशिवाय मृतदेह खाली काढण्यास त्यांनी विरोध केला. यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले हेते. नागरिकांनी उपस्थित पोलिसांवर राग काढण्यास सुरुवात केली.