महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे आहेत, मात्र योग्य अंमलबजावणी होत नसल्याने ते कुचकामी ठरत आहेत. १९८० ते १९९० या दशकात अनेक कायद्याचे पाठबळ महिलांना मिळाले, परंतु योग्या अंमलबजावणीअभावी हे कायदे कुचकामी ठरत आहेत. भ्रूण हत्या रोखण्यासाठी समुपदेशाची गरज आहे. समाजकार्य महाविद्यालयांनी शहर व खेडय़ात याबाबत जागृती करण्याची आवश्यकता आहे, असे मत अ‍ॅड. समशी हैदर यांनी व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद समाजकार्य महाविद्यालयात ‘लैंगिक शिक्षण वय आणि कायदा’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर महाविद्यालयाच्या विश्वस्त आरती जोशी, प्राचार्या डॉ. निला जोशी, पत्रकार विजय वरफडे उपस्थित होते. लैंगिक शिक्षण हे कौटुंबिक जीवन शिक्षण झाले आहे. यातूनच समाज निर्माण होतो. या शिक्षणाबाबत समाजात अद्याप नकारात्मक दृष्टिकोन आहे. समाजकार्य महाविद्यालयांनी त्यांचे कार्य प्रामाणिकपणे केले तर कायद्याची गरज पडणार नाही. शारीरिक बदलांना समजून घेण्यासाठी लैंगिक शिक्षण महत्त्वाचे आहे, असे मत डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केले. समाजात अनेक स्थित्यंतरे येत आहेत. वृत्तपत्रे समाजाचा आरसा आहे. मनावर नकारात्मक छाप पाडणारे विषय कालबाह्य़ होत आहेत, असे पत्रकार वरफडे म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण जोशी यांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्र पार पडले. यासाठी प्रा. श्रीपाद नायब, डॉ. जयश्री खवासे, डॉ. लक्ष्मीकांत देशपांडे आदींना सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन प्रीती गुलाबे यांनी तर आभार प्रमोत सातंगे यांनी मानले.