युवा रुरल असोसिएशनतर्फे सामाजिक आणि शासकीय संस्था व संघटना मिळून २४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर हा जागतिक महिला अत्याचार विरोधी पंधरवडा कार्यक्रमासाठी ‘मिळून सारे आम्ही’ हे व्यासपीठ स्थापन करण्यात आले आहे. नागपूर जिल्हा स्तरावर विविध कार्यक्रम यानिमित्त आयोजित करण्यात येत आहेत. त्याकरता मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ, सारथी ट्रस्ट, संजीवन समाज सेवा संस्था, भैयाजी पांढरीपांडे समाजकार्य महाविद्यालय आदी अनेक संस्था एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. देशात दिवसेंदिवस महिला व मुलींवर अत्याचार वाढत आहेत. त्याचे स्वरूपही भयावह होत चालले आहे. महिला व मुलींवर होणारे अत्याचार ही आजची समस्या नाही. तर भारतात हिंसाचार व अत्याचाराच्या घटना पूर्वीपासूनच घडत आहेत. युरोपातही १९६६ पासून मीरा व बेल या दोन बहिणींची कौटुंबिक हिंसा केली गेली होती. तो २४ नोव्हेंबर हा दिवस होता. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर संपूर्ण युरोपभर वादळ उठले व महिला संघटना रस्त्यावर आल्या. या दिवसाला लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर हा दिन महिला अत्याचार विरोधी दिन म्हणून पाळण्याचा ठराव केला. अशाच दिन भारतातही साजरा व्हावा या दृष्टीने पंधरवडा पाळण्यात येणार असल्याची माहिती टिळक पत्रकार भवनात देण्यात आली. यावेळी विविध संस्था व संघटनांचे प्रतिनिधी विभावरी पांढरे, लता प्रतिभा मधुकर, विशाल सरदार, राजेश मेश्राम आणि संगीता कोलवाडकर आदी उपस्थित होते.
येत्या २४ नोव्हेंबरला युवा रुरल असोसिएशनच्यावतीने वस्ती पातळीवर पोस्टर प्रदर्शन करण्यात येईल. वानाडोंगरी येथे महिलांकरता कायदेविषयक मार्गदर्शन घेणार आहे. त्यानंतर २७ नोव्हेंबरला कन्हान, पारशिवनी तालुक्यात शेतकरी महिलांसाठी कायदेविषयक माहिती दिली जाईल. गुरुवारी २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबरला महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने तालुकास्तरावर लिंग भाव व एचआयव्ही एडस् बाबत माहिती दिली जाईल. कौटुंबिक हिंसाचार कायद्याबद्दल त्याच दिवशी २९ नोव्हेंबरला पांढराबोडी व फुटाळा भागात मातृ सेवा संघ समाजकार्य महाविद्यालयाच्यावतीने माहिती दिली जाईल, असे १० डिसेंबपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.