नागरिकांशी सौजन्याने वागण्याचे आदेश आयुक्त राकेश मारिया यांनी पोलिसांना दिले आहेत. माझे पोलीस नागरिकांचे मित्र असतील असे आश्वासनही त्यांनी पदभार स्वीकारताना दिले होते. शीव येथे एका महिला शिक्षिकेला सीट बेल्ट नसल्याच्या कारणावरून तब्बल पाऊण तास अडवून ठेवत सारिका भैरवार नावाच्या महिला वाहतूक पोलिसाने मात्र, आयुक्तांच्या या आदेशाला पाने पुसल्याचे दाखवून दिले. सारिका भैरवार या माटुंगा वाहतूक विभागात कार्यरत आहेत.
शीव येथे राहणाऱ्या प्रिया सागर (नाव बदललेले) या शिक्षिका गुरुवारी सुट्टी असतानाही काही महत्त्वाच्या कामासाठी शाळेत निघाल्या होत्या. शीव रेल्वे स्थानकाजवळ त्यांना सारिका भैरवार यांनी अडवले. प्रिया यांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता. त्यामुळे नियमाप्रमाणे दंड भरण्याची तयारी त्यांनी दाखविली. पण भैरवार यांनी प्रिया सागर यांना जवळच्या चौकात गाडी आणण्यास सांगितले. तेथे कागदपत्राची त्यांनी बारकाईने तपासणी केली.
‘दंड घ्या आणि मला सोडा’, अशी विनवणी प्रिया सागर करीत होत्या. पाठीत चमक असल्याने सिट बेल्ट लावू शकले नाही, असे सांगत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. मात्र भैरवार यांनी काहीच प्रतिसाद दिला नाहीच, उलट त्या हेतुपुरस्सर वेळ घालवत होत्या. अखेर तब्बल पाऊण तासांनंतर, ‘माझ्याकडे पावती पुस्तक नाही. परवाना जमा करा आणि उद्या या,’ असे सांगून भैरवार यांनी या शिक्षिकेस सोडले.
माझे महत्त्वाचे काम आहे. दंड घ्या आणि जाऊ द्या, असे मी त्यांना विनवत होते, पण त्यांनी मला अडवून ठेवून एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक दिली, असे प्रिया सागर यांनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस उपायुक्त प्रताप दिघावकर (वाहतूक) यांच्याशी संपर्क साधला असता, हा प्रकार अक्षम्य आणि चुकीचा असल्याचे ते म्हणाले. सीट बेल्ट नसल्यास जागेवरच दंड आकारायचा असतो. पोलीस चौकीत नेण्याची गरज नसते, असे त्यांनी सांगितले. साहाय्यक पोलीस आयुक्त उनवणे यांनीही या प्रकारात वाहतूक पोलिसाची चूक असल्याचे सांगून दिलगिरी व्यक्त केली. भैरवार यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
 सारिका भैरवार यांच्या दबंगगिरीचे हे पहिलेच उदाहरण नाही. त्यांच्या अशा दादागिरीचे काही पाढे त्यांच्याच सहकाऱ्यांनीही वाचून दाखविले.