विधिमंडळ सचिवालयात आजपासून कामाला सुरुवात झाली असली तरी मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयासह इतर ठिकाणी मात्र अद्यापही तयारीच सुरू असून हे चित्र पाहता प्रत्यक्ष कामकाजासाठी पुढचा आठवडाच उजाडणार आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. विधिमंडळ सचिवालयाचे कर्मचारी नागपुरात डेरेदाखल झाले असून आजपासून तेथे कामाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पंधरा दिवस आधी विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईहून ट्रकमधून आलेल्या फाईली व कागदपत्रे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली. या फाईली व कागदपत्रे योग्य ठिकाणी ठेवली जात होती. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांची विविध ग्रंथ, संदर्भ आणि ऐतिहासिक नोंदी व इतर कागदपत्रे सुयोग्य जागी ठेवण्यासाठी धावपळ सुरू होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी विधिमंडळ इमारतीत छोटेखानी सभागृहाचे बांधण्यात आले असून तेथे अद्यापही काम सुरूच आहे. पाच-सात दिवसात सभागृह सुसज्ज करावे लागणार असल्याने तेथे वेगाने काम सुरू होते. मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयात अद्यापही तयारी सुरूच आहे. विविध खोल्यांची रंगरंगोटी, लाकडी फर्निचरची दुरुस्ती, विणकाम, पॉलिशिंगची कामे सुरू होती. सचिवालयामागील हैद्राबाद हाऊस परिसरातील बंगले, देवगिरी परिसरातील बंगले, आमदार निवास परिसरातही रंगरंगोटी व इतर कामे सुरू होती. काही दिवसांपूर्वी येथे बाल कामगार कामास ठेवण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन वेळीच सावध झाले. आज कुठेच बाल कामगार आढळले नाहीत. सिव्हिल लाईन्समधील मिठा नीम दर्गा ते वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालय रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते. काही रस्त्यांवर डांबरीकरण झाले आहे. अधिवेशनास दहा-बारा दिवस शिल्लक असून आणखी काही रस्त्यांवरील खड्डे बुजवून डांबरीकरण केले जाणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईहून मुख्यमंत्री सचिवालयातून निवडक कर्मचारी नागपुरात आले असले तरी येथे अद्यापही तयारी सुरू असल्याने त्यांना कामकाज सुरू करता आलेले नाही. परवा बुधवारी गुरुनानक जयंतीची सुटी आहे. त्यामुळे रविवापर्यंत आणखी कर्मचारी नागपुरात येतील. त्यामुळे सोमवारी १ डिसेंबरपासून सचिवालयाचे कामकाज खऱ्या अर्थाने सुरू होईल, असे सांगण्यात आले.