साथी किशोर पवार यांना जिल्ह्य़ात श्रद्धांजली
किशोर पवार यांच्या निधनामुळे साखर कामगार चळवळीची मोठी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, किशोर पवार हे आपले व्यक्तिगत मित्र होते. कामगार नेते गंगाधर ओगले यांच्यानंतर कामगार चळवळीचे नेतृत्व किशोर पवारांकडे आले. त्यांचे कामगार क्षेत्रात मोठे योगदान आहे. सहकारी साखर कारखानदारीत जेव्हा संकट निर्माण झाले आणि एकूणच साखर उद्योगात अस्थिर वातावरण निर्माण होत असताना, कामगार नेते किशोर पवार यांच्या नेतृत्वाखालील साखर कामगारांच्या शिष्टमंडळाने केंद्र सरकारला भेटून साखर कारखानदारी बाहेर काढावी असे म्हणणे मांडले. खंडकरी शेतकऱ्यांच्या चळवळीत त्यांनी शेवटच्या काळात तडजोडीची भूमिका घेऊन शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या पाहिजेत व कामगारांचे हित बघून तोही जगला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले. पवार यांच्या निधनाने साखर कामगार चळवळीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे, या शब्दात विखे यांनी भावना व्यक्त केल्या.
शंकरराव कोल्हे-
अखिल भारतीय साखर कामगार सभेचे समन्वयक साथी किशोर पवार यांच्या निधनाने कामगार संघटनांचा लढवय्या शिरोमणी हरपला, अशा शब्दांत माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी श्रद्धांजली वाहिली.
कोल्हे म्हणाले, की १९३६ मध्ये जिल्हय़ात साखर कारखानदारीचा जन्म झाला. ग. प्र. प्रधान, एस. एम. जोशी, मधु दंडवते, रावसाहेब पटवर्धन या महनीय व्यक्तींनी कामगार चळवळीच्या कामास सुरुवात केली. त्या काळी कामगार संघटनांचे प्राबल्य खूपच कमी होते. पवार हे साधे कामगार होते, मात्र त्यांच्यातील संघटनकौशल्याचा गुण मधू दंडवते, रावसाहेब पटवर्धन यांनी ओळखून त्यांच्याकडे साखर कामगार संघटनेचा कारभार सोपवला आणि किशोरभाईंनी त्यादृष्टीने अहमदनगर जिल्हय़ात नेटाने काम करण्यास सुरुवात केली. साखर कामगार चळवळींचा अभ्यास आणि त्यांच्या प्रश्नांना राज्यपटलावरून केंद्रपटलापर्यंत नेले. साखर कारखानदारीबरोबरच त्यांचा शेती महामंडळ कामगारांच्या प्रश्नांचाही मोठा अभ्यास होता. मनमिळाऊ स्वभाव, प्रश्न सोडविण्याची हातोटी हे त्यांचे स्वभाववैशिष्टय़ होते. साखर व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील मतभेदाची किनार त्यांनी कधीही कारखान्याच्या दैनंदिन कामकाजात आणली नाही. समन्वयाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आणि कामगार यांच्यातील मध्य साधून प्रश्न सोडविले. संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनीही किशोर पवार यांना आदरांजली वाहिली.
गोिवदराव आदिक-
स्वातंत्र्योत्तर काळात कामगार चळवळीला प्रतिष्ठा मिळवून देणारे जे थोडे नेते राज्यात होते, त्यापैकी एक किशोर पवार होते. स्व. अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधू दंडवते यांच्या मार्गदर्शनाखाली ते तयार झाले. त्यांनी विधायक मार्गाने कामगार चळवळ पुढे नेली. डावा व प्रागतिक समाजवादी विचार जोपासला. कामगार चळवळीतील ते शेवटचा दुवा होते. तो निखळल्याने पोकळी निर्माण झाली. ती भरून निघणे कठीण आहे.
भानुदास मुरकुटे-
किशोर पवार हे कष्टकऱ्यांचे नेते होते. कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी ताठर भूमिका न घेता सहमती घडवून आणली. कामगारांवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. पण संस्थेच्या हिताकरिता वेळप्रसंगी दोन पाऊले ते मागे येत. विधायक दृष्टी असलेला हा नेता होता.
अविनाश आपटे-
साखर कामगारांच्या प्रश्नात त्यांनी व्यवस्थापन, सरकार व कामगार संघटनांमध्ये समन्वय घडवून आणला. राज्यकर्त्यांमध्ये त्यांना मान व सन्मान होता. तो त्यांनी कामगार हितासाठी वापरला. किशोर पवार यांनी सिमा लढय़ासाठी वाहून घेतले होते. या लढय़ामागे साखर कामगारांची ताकद त्यांनी उभी केली. नाथ पै, मधू दंडवते यांच्या लोकसभा निवडणुकीची धुरा उचलत परिवर्तनाच्या लढाईत ते सर्वात आघाडीवर असत. त्यांच्यामुळे साखर कामगार चळवळीत गेल्या अनेक वर्षांत संघर्ष झाला नाही. चर्चेतून प्रश्न सुटले. या चळवळीला त्यांनी अधिष्ठाण प्राप्त करून दिले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2013 रोजी प्रकाशित
‘कामगार संघटनांचा लढवय्या शिरोमणी हरपला’
किशोर पवार यांच्या निधनामुळे साखर कामगार चळवळीची मोठी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी व्यक्त केली.
First published on: 03-01-2013 at 03:31 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Workers unions main leader no more