नातेवाईकाच्या किंवा एखाद्या परिचिताच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानात गेल्यानंतर कुणाचेही मन दु:खाने ग्रासले असतेच. आधीच जवळची व्यक्ती गमावल्याचे दु:ख असते त्यात अनेकदा स्मशानभूमीत सोयीसुविधा व स्वच्छतांचा अभावही असतो. वरळी कोळीवाडय़ातील स्मशानभूमीने मात्र या सर्व उणिवा दूर केल्या असून सुशोभिकरणानंतर समुद्राकाठी असलेल्या या अतिशय जुन्या स्मशानाचे रूपच पालटून गेले आहे.
मुंबईच्या मूळ वस्तीपैकी एक असलेल्या वरळी कोळीवाडय़ातील गावकीची मालकी असलेले हे खासगी स्मशान ब्रिटिशांच्या काळापासून अस्तित्त्वात आहे. मात्र त्याला आजचे आधुनिक स्वरूप येईपर्यंत त्यात हळूहळू बरेच बदल झालेले आहेत. आता ही जागा नऊ पाटील जमात आणि गावकरी इस्टेट कमिटी यांची संयुक्त मालकी असलेली हिंदू स्मशानभूमी म्हणून ओळखली जाते. नुकतेच हे सुशोभित स्मशान पुन्हा जनतेच्या सेवेत दाखल झाले आहे.
 संत तुकारामांच्या वैकुंठगमनाचा प्रसंग चित्रित करण्यात आलेले स्मशानाचे प्रवेशद्वार दुरूनच पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेते. शिखरस्थानी गरुडरथावर स्वर्गारोहण करणारे तुकाराम, द्वाराच्या दोन्ही स्तंभांवर द्वारपाल आणि एका बाजूच्या भिंतीवर तुकारामांना अडवण्यासाठी आळवणी करणारे देहूचे गावकरी असे हे संपूर्ण दृश्य अतिशय आकर्षक आहे. स्मशानभूमीच्या आतील भिंतींवर एकूण आठ फायबर म्युरल्स आहेत. स्मशानात रमणारे भगवान शंकर, मनुष्याच्या जन्म- मृत्यूचे चक्र, ज्ञानेश्वरांचे पसायदान, अर्जुनाला गीतोपदेश करणारे श्रीकृष्ण, ईश्वराचे विश्वरूप दर्शन आणि अग्निमंत्र हे सहा म्युरल्स पारंपरिक धार्मिक संकल्पनांवर आधारित आहेत.
याशिवाय, ‘देहदान करा’ आणि ‘स्त्रीभ्रूण हत्या करू नका’ असे आधुनिक काळातील संदेश देणारी दोन म्युरल्स आप्ताला अखेरचा निरोप देण्यास आलेल्या लोकांना सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देतात. या भागाचे आमदार आणि राज्यमंत्री सचिन अहिर यांनी म्युरल्सकरिता स्वत: निवडलेल्या संकल्पनांना कंत्राटदार सचिन पाटील यांनी मूर्त रूप दिले आहे. स्मशानाच्या आतील भागात लावलेली नारळ व बदाम यांच्यासह इतर हिरवीगार झाडेही स्मशानाच्या गांभिर्यात भर टाकत आहेत.
कोळी गावकऱ्यांच्या भाषेत ‘सुरती घोडा’ नावाने ओळखले जाणारे सुमारे ३ लाख रुपये किमतीचे बिडाचे ‘पायर’ (चिता रचली जाते ती जागा), त्याला अग्निरोधक विटांचा मजबूत आधार, त्यावरील गंजरोधक रंग दिलेले शेड, शेवटचा निरोप देण्यासाठी येणाऱ्या लोकांकरता नवे शौचालय, अगदी लगतच असलेल्या समुद्राचे पाणी स्मशानाच्या आत शिरू नये आणि आत साठणारे पाणी निघून जावे यासाठी विशिष्ट रितीने टाकलेल्या वाहिन्या या सर्व बाबीदेखील सोयींमध्ये भर घालणाऱ्या आहेत. गेली सुमारे सहा महिने स्मशानाचे सुशोभिकरण सुरू होते.
सामान्य लोकांसाठी कोळी समाजाची ओळख केवळ मासेमारीपुरती असली, तरी त्यांच्यात वारकरी संप्रदायाचे अनेक लोक आहेत. या संप्रदायाच्या परंपराही कोळी समाज जपतो, हे दाखवण्यासाठी त्याला सुसंगत अशी ज्ञानेश्वर आणि तुकाराम या संतांचे संदेश देणारी दृश्ये चितारण्याची कल्पना मला सुचली. नऊ पाटील जमातीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, विश्वस्त विजय वरळीकर, चंद्रसेन काटकर यांच्यासह कोळी समाजानेही ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत केली, असे आमदार सचिन अहिर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.