‘लव्ह सेक्स और धोका’, ‘रागिनी एमएमएस’ आणि ‘शैतान’.. अशा चित्रविचित्र नावांचे चित्रपट तुम्ही पाहिले असतील तर त्यातला एकच साधा चेहरा आणि किरकोळ वाटावा अशा व्यक्तिमत्वाचा राजकुमार यादव नावाचा कोणीएक कलाकार आठवल्याशिवाय राहणार नाही. कारण, आता तो कोणीएक कलाकार राहिलेला नाही. अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘कायपोचे’ या चित्रपटातील सामान्य घरातील गोविंदला राजकु मारने आपला एक चेहरा दिला. लोकांना राजकुमारचे काम इतके आवडले की आता हिंदीतील हटके चित्रपटांमध्ये राजकुमारची नवी यादवी सुरू झालेली आहे. ‘तलाश’ मध्ये आमिरबरोबर काम केल्यानंतर राजकुमार पहिल्यांदाच सोलो भूमिकेत दिसणार आहे. हंसल मेहता दिग्दर्शित ‘शाहीद’ या चित्रपटात राजकुमार मुख्य भूमिकेत असून पाठोपाठ कंगनाबरोबरचा ‘क्वीन’ आणि फ्रि दा पिंटोबरोबर ‘एनएच १०’ अशा चांगल्या चित्रपटांमध्ये नायकाच्या भूमिकेत राजकुमार दिसणार आहे. सध्या राजकुमार चर्चेत आहे तो मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या शाहीद आझमी या वकिलाच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘शाहीद’ या चित्रपटासाठी. ‘एलएसडी’ ते ‘शाहीद’ या प्रवासाविषयी राजकुमारशी मारलेल्या गप्पा..
‘कायपोचे’ चित्रपटाचे यश आणि ‘शाहीद’मधली मुख्य भूमिका हा टप्पा राजकुमारसाठी हिंदीत अभिनेता म्हणून स्थिरावतो आहोत असा हलका का होईना आनंद देणारा असेल, असे वाटत होते. पण, राजकुमारचा यावरचा विचार वेगळा आहे. इतर चारचौघांसारखा दिसणारा मी अभिनेता होण्यासाठीच दिल्लीतून मुंबईत आलो पण, इथे कलाकार म्हणून स्थिरावण्यासाठी जी स्ट्रगल करावी लागते ती मी पुरेपूर के लेली आहे. तुमचा अभिनय चांगला आहे की नाही, तुमचा चेहरा चांगला आहे असे कुठलेच आडाखे यश मिळवण्यासाठी उपयोगी नसतात, राजकुमार सांगतो. दिल्लीत नाटकांमध्ये जीव रमला होता तेव्हाच पुढे जाऊन आयुष्यात आपण अभिनयच करू शकतो, हे लक्षात आले होते. त्यासाठी गुरगावमधल्या छोटय़ा खेडय़ात वाढलेला माझ्यासारखा साध्या चेहऱ्याचा राजकुमार नावाचा तरूण पुण्यात दाखल झाला. मी ‘एफटीआयआय’मध्ये रितसर दोन वर्षांचे अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. २००८ साली मुंबईत आलो तेव्हापासून ऑडिशन्स आणि काम मिळावे यासाठी निर्मात्यांकडे दारोदार फिरलो आहे. माझा चेहरा चित्रपटांसाठी योग्य नाही, या कारणास्तव मी अनेक नकार पचवले आहेत. माझ्यातल्या अभिनयक्षमतेवर विश्वास असूनही केवळ काम नाही म्हणून निर्मात्यांना विनवण्या केल्या आहेत. एक वेळ अशी होती की माझ्याकडे बसचे तिकीट काढण्यासाठीही पैसे नव्हते. त्यामुळे ‘कायपोचे’ चित्रपट हिट झाल्यानंतर मला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. माझ्याकडे चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स आहेत तरी स्ट्रगल्या आठवणी संपलेल्या नाहीत, असे त्याने सांगितले.
दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित ‘लव्ह, सेक्स और धोका’ हा राजकुमारचा पहिला चित्रपट. त्याचीही आठवण त्याने सांगितली. खूप सारे नकार घेऊन उदास मनाने वावरणाऱ्या मला एका सकाळी वृत्तपत्रात ‘एलएसडी’साठी नविन चेहरा हवा आहे, अशी बातमी वाचली. मी माझे फोटो मेल केले. त्यांना चित्रपटासाठी दिल्लीवाला तरूण हवा होता. ऑडिशनपूर्वी मसल्स बनवण्यासाठी मी व्यायाम करत होतो. ऑडिशनला गेल्यानंतर मला चित्रपट मिळणार याची खात्री वाटत होती. प्रत्यक्षात माझा अवतार बघूनच आम्हाला या चित्रपटासाठी सामान्य घरातला वाटेल असा किरकोळ देहयष्टीचा तरूण हवा होता. पुन्हा एकदा माझ्या हातून चित्रपट गेला असं वाटत असतानाच दुसऱ्या दिवशी दिबाकर बॅनर्जीला ऑडिशन आवडली आहे तुम्ही पुन्हा या पण, यावेळी तुम्ही बारिक दिसले पाहिजे, असा तंबी देणारा फोन आला. अशातऱ्हेने ‘एलएसडी’ माझ्याकडे आला. मग एकता कपूरचा ‘रागिणी एमएमएस’ आला. बिजॉय नम्बियारच्या ‘शैतान’मध्ये तर माझी लहानशी भूमिका होती त्यामुळे मी खरंतर नकारच दिला होता. पण, बिजॉयने पाहूणा कलाकार म्हणून श्रेय देण्याचे क बूल केल्यानंतर मी ती भूमिका स्वीकारली. आता मला लक्षात येतंय की भूमिका छोटी-मोठी नसते. प्रत्येक भूमिकेचं आपलं एक महत्व असतं ते जाणूनच निवड केला पाहिजे. ‘तलाश’ मधली भूमिका तर केवळ आमिरबरोबर काम करायला मि़ळणार म्हणूनच केली होती, तो सांगतो.
‘शाहीद’ सारखा चरित्रपट करणं तेही आत्ता या टप्प्यावर यात धोका नाही वाटला का?, असं विचारताच शाहीद आझमीच्या आयुष्याची कथाच इतकी थरारक आणि विविध कंगोरे असणारे आहे की या भूमिकेसाठी नाही म्हणणे शक्यच नव्हते, असे तो स्पष्ट करतो. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड घ्यायचा म्हणून दहशतवादाकडे वाटचाल करणारा आणि आपली चूक लक्षात आल्यानंतर वकिलीचे शिक्षण घेऊन दहशतवादाच्या जाळ्यात ओढले गेलेल्या निष्पाप तरूणांना वाचवण्यासाठी वकिल म्हणून काम करणारा शाहीद आझमी हा सामान्यातला असामान्य होता. त्याची कथाच इतकी प्रेरणादायी आहे की त्या भूमिकेतून बाहेर पडताना मला एक अभिनेता म्हणून फार यातना झाल्या, असे राजकुमारने सांगितले. शाहीदची छायाचित्रे, त्याच्याबद्दलचे संदर्भ फार अपूरे असल्याने सतत त्याच्या कुटुंबियांशी बोलणे, भावाकडून ऐकलेल्या आठवणी, कोर्टात जाऊन प्रत्यक्ष सुनावणी अनुभवणं अशा अनेक गोष्टींचा आधार घेत मी शाहीद उभा केला. त्यामुळे त्याच्या भूमिकेशी इतका समरस झालो की आता चित्रपट पूर्ण झाल्यानंतर शाहीद माझ्याकडून निसटत चालला आहे, अशी विचित्र भावना मनात घर करून असल्याचे तो सांगतो. पण, ‘शाहीद’ हा चित्रपट लोकांना नक्की आवडेल, असा विश्वासही त्याला वाटतो आहे. एकीकडे ‘शाहीद’चे प्रसिध्दी कार्यक्रम आणि दुसरीकडे कंगना राणावतबरोबरच्या क्वीन चित्रपटाचे चित्रिकरण आणि ‘एनएच १०’ची तयारी अशा लागोपाठ कामांमध्ये तो गुंतला आहे. पण, अजून अभिनेता म्हणून आपल्याला यश मिळाले आहे असे वाटत नसल्याचे तो सांगतो. ‘एलएसडी’ करतानाच दिबाकर बॅनर्जीने मला एक कानमंत्र दिला होता, ‘नेहमी शून्य अपेक्षेची भावना मनात ठेवून चोख काम पार पाड. मग तुला अगदी ४ टक्के यश मिळालं तरी ते मोठं वाटतं. शंभर टक्के अपेक्षा ठेवायची आणि ५० टक्केही पूर्ण झाले नाही म्हणून आपल्यावर इमोशनल अत्याचार करायचे हे योग्य नाही’. दिबाकरची ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवली आहे. त्यामुळे अपयश आले तरी मी हरणार नाही आणि यश आले तरी वाहवणार नाही, असे तो ठामपणे सांगतो. त्यामुळे या राजकुमाराची हटके चित्रपटांवरची यादवी ही बराच काळ टिक णार आहे.