जन्मदर नियंत्रण उपाययोजनेअभावी बेवारस कुत्र्यांची संख्या अचानक वाढल्याने गांधी जिल्हयात श्वानदंशाच्या वार्षिक दहा हजारावर घटना घडत असल्याची धक्कादायक आकडेवारी उघड झाली आहे. सेवाग्राम, सावंगी व सामान्य रूग्णालयात यासंदर्भात तपासणी केल्यावर ही आकडेवारी पुढे आली. या तीन रूग्णालयात श्वानदंशाचा उपचार घेणारे ५३२७, खाजगी रूग्णालयात २६०० तर पारंपारिक मांत्रिककडे उपचार घेणारे अन्य रुग्ण अशांची आकडेवारी दहा हजारावर जात असल्याचे पिपल्स फ ॉर अॅनिमल या पशुप्रेमी संघटनेने निदर्शनास आणले आहे.
प्रामुख्याने बेवारस कुत्र्यांना चावा घेतलेले हे रुग्ण आहेत. कुत्रा चावल्याने बळी गेलेल्यांची संख्या निदर्शनास आली नाही. पण प्रामुख्याने श्वानदंशावर मांत्रिकांकडून उपचार करून देणाऱ्या ग्रामीण निरक्षरांमधे मृत्यूचे प्रमाण आढळू शकते, याकडे या संघटनेचे सचिव आशिष गोस्वामी यांनी लक्ष वेधले. बेवारस कुत्र्यांची भरमार दिसून येण्यामागे मुख्यत: त्यांच्यावर जन्मदर नियंत्रण शस्त्रक्रिया करण्यात अपुरे पडणारे प्रशासन, हेच आहे. कुत्र्याने चावा घेतल्यावर ‘अॅन्टी रॅबीज’ लसीकरणाचा एकमेव उपाय आहे. ती सर्वत्र उपलब्ध होत नाही. पण, भीक नको पण कुत्रा आवर, अशा म्हणीनुसार कुत्र्यांवरच शस्त्रक्रिया करणे गरजेचे ठरले आहे. पण याकामासाठी निधीच नसल्याचे धक्कादायक उत्तर पशू आरोग्य विभागाने दिले. शासनाकडे असा नन्नाचा पाढा ऐकालया मिळाल्यावर पशुप्रेमी स्वयंसेवी संघटनेने याकामी पूढाकार घेतला.
बेवारस कुत्र्यांचा जन्मदर नियंत्रण करण्यासाठी सावंगी येथील मेघे अभिमत विद्यापीठाने या संघटनेस जन्मदर नियंत्रणाचा अपेक्षित तो खर्च दिला. साहित्यही पुरविले. पण फ क्त सावंगी परिसरातीलच बेवारस कुत्र्यांसाठी ही मदत मिळाली. शहरी भागातही बेवारस कुत्र्यांचा मोठा उच्छाद आहे. तो पाहून पिपल्स फ ॉर अनिमल्सने पिपरी येथील त्यांच्या पशु अनाथालयात शस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञ डॉक्टर नेमला. शिवाय संघटनेने रोटरीचे सहकार्य घेऊन जवळपास अडीच हजार जन्मदर नियंत्रण शस्त्रक्रिया घडवून आणल्या. तरीही श्वानदंशाचे प्रमाण कमी झालेले नाही.
या पशुप्रेमी संघटनेने यासंदर्भात लोकांपर्यत संदेश पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे. ग्रामपंचायत परिसरात ग्रामपंचायत सदस्य तर शहर परिसरात नगरसेवकाला बेवारस कुत्र्यांबाबत लोकांनी जाब विचारला पाहिजे, असे या संघटनेने म्हटले आहे. शासकीय ग्रामीण व शहरी रूग्णालये, खाजगी रूग्णालये, खाजगी महाविद्यालये याठिकाणी श्वानदंशावरील उपाययोजना अपेक्षित आहे. पण, जन्मदर नियंत्रण शिबीर घेण्यासाठी आमदार-खासदारांनी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. बेवारस असणारी कुत्री ही भुकेली असतात. त्यामुळे उपाशीपोटी असणारा राग ते जवळपास फि रकणाऱ्या माणसांवर काढतात. या बेवारस कुत्र्यांना चांगले जगता यावे, याची जाणीवही परिसरातील नागरिकांनीच ठेवावी, असे पशुप्रेमींचे म्हणणे असून श्वानदंशाचा वर्षांगणिक वाढता आलेख जर रोखला गेला नाही तर या घटना इतर अपघातांपेक्षाही भयावह ठरतील, असा इशारा देण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2013 रोजी प्रकाशित
वर्धा जिल्ह्य़ात श्वानदंशाच्या वर्षांला दहा हजारावर घटना
जन्मदर नियंत्रण उपाययोजनेअभावी बेवारस कुत्र्यांची संख्या अचानक वाढल्याने गांधी जिल्हयात श्वानदंशाच्या वार्षिक दहा हजारावर घटना घडत असल्याची धक्कादायक आकडेवारी उघड झाली आहे. सेवाग्राम, सावंगी व सामान्य रूग्णालयात यासंदर्भात तपासणी केल्यावर ही आकडेवारी पुढे आली.
First published on: 19-01-2013 at 01:14 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yearly more than ten thousand cases of dog bite vardha district