तुझा चेहरा उठावदार नाही, असं सतत ऑडिशनला गेल्यावर कांचन पगारे याला ऐकायला मिळत असे. त्यामुळे अनेकदा कांचनचा भ्रमनिरास झाला. परंतु, त्याने हार मानली नाही. त्याच्यातली गुणवत्ता अखेर कॅडबरी फाइव्ह स्टारच्या ‘अरे रमेश- अरे तु सुरेश’ या दोन मित्रांच्या जाहिरातीने सर्वासमोर आणली. त्यानंतर मात्र कांचन पगारे हा चेहरा सर्वानाच आपलासा वाटू लागला.
मला ऑडिशनला पाहिल्यावर ‘अरे हा पोलिसाच्या रोलमध्ये बरा दिसेल’, असं बोललं जायचं. आणि त्यातही अरे याची उंची कमी आहे म्हणून नाकारलं जायचं. ऑडिशनला गेल्यावर नकार हा ठरलेलाच असायचा. ऑडिशनला गेल्यावर तिथे येणारे मस्त उंचीपुरी, देखणे तरुण पाहिल्यावर मला खरोखर वाईट वाटायचं. मलाही असा गोरा वर्ण आणि मस्त उंची असावी असं सतत वाटत असे. पण हळूहळू कळून चुकलं की काम मिळवण्यासाठी तुमचं सादरीकरणही तितकंच महत्त्वाचं असतं.
आपण दिसतो कसे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात, हे खरं आहे. जाहिरात क्षेत्रात जाऊन काहीतरी करूया, असं म्हणत मी या क्षेत्रात आलो होतो. पण, महिन्यातून किमान पन्नास वेळा ऑडिशन्सला जाऊनही काम मिळायचं नाही. आणि काम न मिळण्याचं कारणही कळायचं नाही. कालांतराने उत्तर मिळू लागलं की, तुझा चेहरा उठावदार नाही. म्हणजे काय तर गोरा वर्ण आणि मस्त उंची. या गोष्टी माझ्याकडे नव्हत्याच त्यामुळे मी त्या कशा आणू शकणार होतो? पण, मी तरीही या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्यात काय बदल करता येतील यासाठी विचारपूर्वक प्रयत्न सुरू केले. सतत न थकता ऑडिशन्स देत राहिलो. एका दिवसात किमान पाच ऑडिशन्स असं चक्र सुरू होतं. सतत मेहनत करत राहिल्यावर मलाच माझ्याकडे खास गुण काय आहे तो लक्षात आला. आणि तो खास गुणच मला कामं मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरला.
त्यानंतर कामं सुरू झाली. पण, जाहिराती मिळू लागल्यावरही मी माझी भाषा, माझा पेहराव यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये बदल करू लागलो. कुठले बदल केल्यावर मी लोकांना अधिक आवडेन याचाच मी विचार करत होतो. समोरचा आपल्याला नाकारतो तेव्हा त्याच्या डोक्यात काही ठरलेले नियम असतात. आपण त्याचे वाईट वाटून न घेता आपल्यात सहजपणे कोणते बदल करता येतील याकडे लक्ष द्यायला हवे. बऱ्याचदा नकार मिळाल्यावर फार वाईट वाटायचं, पण ते क्षणभरच. ‘फेविकॉल’, ‘कॅडबरी’ यांसारख्या ब्रँडच्या जाहिरातींनी माझ्या करिअरला एक वेगळे वळण दिले. आंतरराष्ट्रीय ब्रँडस्च्या जाहिरातींमध्ये मुख्य मॉडेल म्हणून माझा चेहरा झळकू लागला होता. या जाहिरातींनी माझा आत्मविश्वास खरोखर वाढला होता. मला या क्षेत्रातलं एक समीकरण कळलं ते म्हणजे तुमच्यात तुमचं वेगळं असं काहीतरी हवं.
कांचनचा सल्ला
जाहिरात क्षेत्रात नकार जास्त वाटय़ाला येतो म्हणून तुमचा आत्मविश्वास कमी व्हायला नको. या क्षेत्रामध्ये टिकायचं असेल तर सातत्याने ऑडिशन देत राहणं गरजेचं आहे. ऑडिशनमध्ये सातत्य ठेवा. एखादं काम मिळाल्यावर अतिउत्साहित होऊ नका. इथे एकेका जाहिरातीसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. काम भले काही मिनिटांचं असेल, पण त्यातून मिळणारी प्रसिद्धी ही खूप मोठी आहे, हे लक्षात घेऊन काम करा.
कांचनने केलेल्या जाहिराती
कॅडबरी फाइव्ह स्टार रमेश-सुरेश, फेविकॉल मरीन, आयडिया अभिषेक बच्चन सोबत