नशा करण्याचे वेगवेगळे प्रकार अनुभवले जात असतात. परंतु लहान मुले व महाविद्यालयीन तरुणांनी एक नवीन नशाप्रकार शोधला आहे.
तुटलेल्या वस्तू, फाटलेल्या वहय़ा चिकटविण्यासाठी वापरले जाणारे फेव्हीबॉन्ड व खाडाखोड सुधारण्यासाठी वापरले जाणारे व्हाइटनर हे नशा करण्याचे नवीन साधन या मुलांना सापडले आहे. १० रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत कोठेही मिळणारे हे साधन एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ओतून त्या पिशवीत तोंडाने हवा भरायची व पिशवी नाकाला लावून दीर्घ श्वास घ्यायचा असा प्रकार दोनतीन वेळा केला की नशा चढते.
सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी आढळणाऱ्या खोकल्याच्या औषधांच्या बाटल्या हाही नशेचा एक स्वस्तातलाच प्रकार आहे. अनेक शहरांतील फेव्हीबॉन्डची विक्री सध्या वाढली आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालये व यासाठीची स्टेशनरी दुकाने येथून या नशिल्या टय़ूबची मुबलक विक्री होऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे.
गुटखा, गांजा, अफू, चरस, दारू, शिवाय लहान मुलांना वेगळय़ा नशिल्या पदार्थाकडे घेऊन जाणाऱ्या स्वस्तातल्या उपायांचा लहान मुलांच्या वापरावर मर्यादा आणणे गरजेचे आहे. शाळा परिसरात याचा जास्त वापर होत असल्यास व्यवस्थापनानेही यावर लक्ष ठेवायला पाहिजे. अनेक आडबाजूला लहान मुले व महाविद्यालयीन युवक एकत्र येऊन ही नशा करताना आढळतात. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तसेच नशेपासून मुलांनी व तरुणांनी दूर राहावे असे आवाहन समाजधुरीणांनी केले आहे.