जनावरांच्या छावण्या गरज पाहून नव्हे तर कार्यकर्त्यांचे तोंड पाहून दिल्याचा आरोप करतानाच पशुधन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना आता जनावरांसह पक्ष प्रवेश करावा लागणार काय असा सवाल युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल झावरे यांनी आज केला.
जनावरांच्या छावण्या तसेच पिण्याच्या पाण्याच्या टँकरला मंजुरी देताना पक्षपातीपणा केला जात असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल झावरे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी तहसीलदार जयसिंग वळवी यांची भेट घेऊन दुष्काळ निवारणातील मनमानीवर आक्षेप घेतला.
प्रशासकीय यंत्रणा कोणास आंदण दिल्यासारखी वागत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, आमची संवेदनशीलता म्हणजे कमकुवतपणा नाही.
प्रक्रियेची तंतोतंत अंमलबजावणी करून तहसीलदारांनी कणखर भुमिका घेण्याची मागणी त्यांनी केली. रामचंद्र मांडगे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष मारूती रेपाळे, आत्माचे अध्यक्ष शैलेंद्र औटी, बाळासाहेब पठारे, संभाजी रोहकले आदी यावेळी उपस्थित होते.