वाघाच्या पिंजऱ्यासमोर हरणाचा पिंजरा असेल तर त्या प्राण्याला भीती नाही का वाटणार? त्यामुळे प्राणिसंग्रहालयाची रचना करताना शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांचे पिंजरे जवळ असता कामा नयेत, अशी शिफारस केंद्रीय प्राणिसंग्रहालय आरेखन समितीच्या सदस्यांनी महापालिकेस केली. शहराच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाची पाहणी केल्यानंतर ३४ एकर क्षेत्रावरील विकास आराखडय़ास लवकरच मंजुरी दिली जाईल, असे या समितीतील सदस्य ए. एस. डोंगरा यांनी सांगितले. सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाच्या विकासासाठी १६ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असणाऱ्या प्राणिसंग्रहालयाशेजारी नाला आहे. त्याचा प्राण्यांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. तसेच प्राणिसंग्रहालयाची रचना जुन्या धाटणीची असल्याने त्याचे अत्याधुनिकीकरण करणे गरजेचे असल्याचेही डोंगरा यांनी सांगितले. मूलत: शहरातील हे प्राणिसंग्रहालय मिटमिटा येथे स्थलांतरित करावे.
 प्राणिसंग्रहालयासाठी किमान १०० ते १२५ एकर जागा असावी, असे अपेक्षित आहे. ते तातडीने स्थलांतरित व्हावे, या साठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे समितीतील सदस्यांनी सांगितले. सकाळी पाहणी दौऱ्यानंतर या समितीतील सदस्य डॉ. ए. के. मल्होत्रा व ए. एस. डोंगरा यांनी महापौर कला ओझा यांची भेट घेतली.
 नव्याने प्रस्तावित विकास आराखडय़ास मंजुरी देण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, असेही त्या म्हणाल्या. प्राणिसंग्रहालयातील हत्ती या पुढे तेथे ठेवता येणार नाहीत. केंद्र सरकारनेच तसा निर्णय घेतला असल्याने तेथील हत्ती हलविले जातील, असेही त्यांनी सांगितले.