‘स्वातंत्र्य’ या शब्दाचा अर्थ कळण्यासाठी अरब देशात अजूनही बरेच दिव्य करावे लागते. अहमद नाजी या तरुण लेखकाची कहाणी अशातलीच एक. या तरुण लेखकाने ‘द यूज ऑफ लाइफ’ नावाची कादंबरी लिहिली, ती क्रमश: पद्धतीने ‘अखबार अल अदब’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. त्यात काही कामुक वर्णने होती म्हणून सरकारने त्यांना दोन वष्रे तुरुंगात टाकले आहे. नाजी यांना यंदाचा पेन-बाब्रे लेखनस्वातंत्र्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुळातच इजिप्तची राजधानी असलेल्या कैरोत रोमँटिक कहाण्या किंबहुना लैंगिकतेवर जाहीर चर्चा करणे निषिद्धच आहे. तेथील पत्रकारांनाही सरकारच्या विरोधात लेखणी चालवाल तर खबरदार असा आदेशच आहे. त्या देशातल्या नाजी नावाच्या या लेखकाचा जन्म मानसुरा येथे १९८५ मध्ये झाला. इजिप्तच्या साहित्यातील एक प्रयोगशील लेखक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. २००५ मध्ये वासिया खयालक (वाइडन युवर इमॅजिनेशन) हा ब्लॉग त्यांनी लिहिण्यास सुरुवात केली. २००६ मध्ये पत्रकारितेतील पदवी घेऊन ‘अखबार अल अदब’ या साहित्यविषयक नियतकालिकात काम करू लागले. त्यांनी सबा दुरूस मुस्ताक मिन अहमद मकी (सेव्हन लेसन्स ड्रॉन फ्रॉम अहमद माकी) हे ई-बुकही लिहिले आहे. ‘ब्लॉग फ्रॉम पोस्ट टू ट्वीट’ या पुस्तकात त्यांनी २००३ ते २०१० मधील इजिप्तच्या सर्व ब्लॉिगग विश्वाचा धांडोळा घेतला आहे. त्यांची ‘रॉजर्स’ ही पहिली कादंबरी २००७ मध्ये प्रसिद्ध झाली. िभत हे प्रतीक घेऊन त्यांनी एक वेगळाच प्रयोग त्यात केला होता. ‘द यूज ऑफ लाइफ’ ही कादंबरी त्यांनी २०१४ मध्ये सादर केली, त्यातही कॉमिक्स व संकल्पनाचित्रांचा वापर संवादासाठी केला होता. ‘टोक टोक’, ‘अल शाकमगिया’ व ‘फूट थ्री अलेन बोकरा’ या पुस्तकांमध्ये जशी चित्रे वापरली आहेत तसेच तंत्र त्यांनी यात वापरले होते. तरीही तिला पूर्ण ग्राफिक कादंबरी म्हणता येणार नाही. ही कादंबरी सेन्सॉर मंडळाने वाचून तिला मान्यता दिली होती, मग वाद कसा झाला? तर एका व्यक्तीने ही कादंबरी वाचून आपले हृदय धडधडले, रक्तदाब कमी झाला व आपण आजारी पडलो असे सांगून न्यायालयात दाद मागितली. त्यात नाजी यांना दोन वष्रे तुरुंगात टाकण्यात आले. सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे, कारण त्यांच्या कादंबरीत लैंगिक स्वरूपाची वर्णने आहेत, पण ती त्या कथेचा भाग म्हणून आलेली आहेत. नाजी यांची कादंबरी बरूतमध्ये छापली गेली व तिला वाचकपसंतीत पाचपकी साडेतीन गुण मिळाले आहेत. लेखनस्वातंत्र्यासाठी तुरुंगवास पत्करलेल्या लेखकांना ‘पेन’ पुरस्कार दिला जातो. या वेळी १६ मे रोजी नाजी यांना मॅनहटन येथे पुरस्कार दिला जाईल, पण त्यांच्या वतीने तो कोण स्वीकारणार हे अजून समजलेले नाही. सामाजिक मूल्यांचा ऱ्हास व धार्मिक संकेतचिन्हांची अवमानना करण्याचा आरोप असलेला हा तरुण लेखक अवघ्या तिशीतील आहे. लेखनस्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या अशा व्यक्तीच साहित्यसंस्कृती घडवत असतात.