शत्रूच्या प्रदेशात शिरून केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्याची बरीच चर्चा झाली. त्याचा ज्वर अजूनही ओसरलेला नाही. या स्थितीत ताबा रेषेचे उल्लंघन न करता पर्वतीय क्षेत्रात दडून बसलेल्या घुसखोरांना हवाई हल्ल्यांद्वारे जेरीस आणण्याचे कसब स्मरणात राहणे खचितच अवघड. सिमला कराराचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन कारगिल युद्धात अवघड भौगोलिक परिस्थितीत भारतीय हवाई दलाने ही कामगिरी फत्ते केली होती. मर्यादित युद्धात हवाई दलाचा वापर सहसा केला जात नाही. त्यामुळे कारगिल युद्धातही तो प्रारंभी टाळण्यात आला. कारण, हे दल रणांगणात उतरल्यानंतर युद्धाचे स्वरूप बदलण्याचा धोका असतो. कारगिल वेळी अखेरच्या टप्प्यात हा धोका पत्करून हवाई दलाने ‘सफेद सागर’ मोहिमेद्वारे भेदक माऱ्याने घुसखोरांना धडा शिकविला. या मोहिमेची जबाबदारी ज्या लढाऊ विमानांच्या तुकडीवर होती, तिचे नेतृत्व केले एअर मार्शल बीरेंद्र सिंग धनोआ यांनी. भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदाची धुरा धनोआ यांच्याकडे सोपविली जात असताना त्यांच्या विस्तृत कामगिरीतील हे महत्त्वाचे उदाहरण. या युद्धातील कामगिरीबद्दल त्यांना युद्ध सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तब्बल ३८ वर्षांच्या सेवेत धनोआ यांनी विविध विभागांची जबाबदारी कौशल्यपूर्वक सांभाळली आहे. ७ सप्टेंबर १९५७ रोजी जन्म झालेल्या बीरेंद्र यांचे वडील एस. एस. धनोआ हे प्रशासकीय सेवेत अधिकारी होते. धनोआ कुटुंबाला लष्करी सेवेचा वारसा लाभला आहे. बीरेंद्र सिंग यांचे आजोबा संत सिंग हे ब्रिटिश-इंडियन आर्मीत कॅप्टन होते. दुसऱ्या महायुद्धात जपानविरुद्धच्या लढाईत ते सहभागी झाले होते. हा वारसा बीरेंद्र सिंग यांनी पुढे नेला. रांचीतील सेंट झेविअर्स शाळेत त्यांचे शिक्षण झाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, राष्ट्रीय भारतीय सैनिकी महाविद्यालय येथे शिक्षण घेऊन जून १९७८ मध्ये ते हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून दाखल झाले. वेगवेगळ्या क्षमतेच्या लढाऊ विमानांच्या सारथ्यामुळे हवाई प्रशिक्षक म्हणून त्यांची खास ओळख झाली. हवाई दल उपप्रमुखपदी नियुक्ती होण्याआधी त्यांनी दक्षिण-पश्चिमी हवाई दलाच्या मुख्यालयाचे प्रमुख म्हणून काम पाहिले. देशातील आघाडीवरील हवाई तळाचे कमांडर, परदेशात भारतीय सैन्य प्रशिक्षण दलाचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तामिळनाडूतील राष्ट्रीय संरक्षण सेवा अधिकारी महाविद्यालयात मुख्य प्रशिक्षक (हवाई दल), गुप्तचर विभागाचे साहाय्यक प्रमुख, आघाडीवरील दोन तळांवर वरिष्ठ अधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. सेवा काळात उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध पदकांनी त्यांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये कारगिल युद्धासाठी युद्ध सेवा पदक, वायुसेना पदक आणि अलीकडेच दिल्या गेलेल्या अतिविशिष्ट सेवा पदकाचाही अंतर्भाव आहे. हवाई दलाचे सारथ्य करताना प्रदीर्घ अनुभव धनोआ यांना उपयुक्त ठरणार आहे.

 

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air marshal bs dhanoa
First published on: 23-12-2016 at 02:21 IST