धारणा करतो तो धर्म; पण म्हणून धर्मावरच अवलंबून राहायचे का, हा प्रश्न वयाच्या पस्तिशीनंतर डॅनिएल कॅलहान यांना पडला.. तोवर तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून ते स्थिरस्थावर झाले होते. ‘कॅथोलिकधार्जिणे तत्त्वज्ञान-अभ्यासक’ अशी त्यांची ओळखदेखील दृढ झालेली होती. मात्र रूढ धर्माच्या मर्यादा जाणवल्यानंतरही त्याच धर्मावर अवलंबून राहणे त्यांनी नाकारले आणि आजच्या समस्यांना आजच्या- किंबहुना उद्याही योग्यच ठरणाऱ्या- अभ्यासासह भिडले पाहिजे, हे ओळखले. या मतपरिवर्तनानंतर त्यांची कारकीर्द बहरली आणि ‘जैवतत्त्वज्ञान’ किंवा बायोएथिक्स या क्षेत्रातील महत्त्वाचे तत्त्वज्ञ- जैवनीतिज्ञ- म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर झाली. ‘हेस्टिंग्ज सेंटर’ हे जैव-नीती अभ्यास केंद्र स्थापणारे डॅनिएल कॅलहान गेल्या आठवडय़ात, १६ जुलै रोजी कालवश झाले, पण त्यांची ४७ पुस्तके मागे उरली!

या ४७ पैकी नऊ पुस्तकांना अमेरिकी सरकारचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ‘सेटिंग लिमिट्स : मेडिकल गोल्स इन अ‍ॅन एजिंग सोसायटी’ हे पुस्तक १९८७ सालच्या प्रतिष्ठित ‘पुलित्झर पारितोषिका’च्या स्पर्धेतही होते. ‘वृद्धांची संख्या वाढतच जात असलेल्या देशांनी, वृद्धांना दिल्या जाणाऱ्या औषध-उपचार सवलतींना काहीएक मर्यादा ठेवलीच पाहिजे’ अशी अप्रिय परंतु तर्कशुद्ध मांडणी ‘सेटिंग लिमिट्स’ या पुस्तकाने केली. वैद्यकीय सेवासुविधांवरील अफाट खर्च, हा अमेरिकेसारख्या सधन देशाच्याही धोरणांना कुंठित करणारा आहे, याची अभ्यासपूर्ण मांडणी त्यांनी केलीच, परंतु ‘देशाच्या सरकारने आरोग्य सेवा इतक्या महाग होत असताना, नागरिकांच्या आरोग्याची काळजी किती करावी?’ या तात्त्विक, नैतिक प्रश्नालाही किमान चार पुस्तकांतून ते भिडत राहिले. १९३० साली जन्मलेल्या डॅनिएल कॅलहान यांनी स्वत:च्या उतारवयात, म्हणजे सन २००० नंतर यापैकी तीन पुस्तके लिहिली आहेत, हे विशेष. त्यातील त्यांचा दृष्टिकोन सरकारच्या मर्यादा मान्य करणारा आणि वृद्धांना खडतर आयुष्यास सामोरे जाण्यास सांगणारा आहे. टीकाकारांच्या मते तो स्थितीवादी ठरेल, परंतु या अपरिहार्य स्थितीवादाची तात्त्विक मांडणी कॅलहान यांनी केली.

तरुणपणी ‘द कॅथोलिक केस फॉर कॉन्ट्रासेप्शन’ हा प्रबंध लिहिणारे, कर्मठ ख्रिस्ती चौकटीतही गर्भनिरोधनाचा प्रचार करू पाहणारे कॅलहान हे ती वैचारिक चौकट सोडल्यानंतर गर्भपाताचेही समर्थक बनले होते. मात्र त्यांच्या पत्नी- आणि त्यांच्या सहा मुलांची आई- सिडने या पक्क्या गर्भपातविरोधक. या दाम्पत्याने मिळून ‘अ‍ॅबॉर्शन : अंडरस्टँडिंग डिफरन्सेस’ हे पुस्तक लिहिले! त्यांच्या निधनाने निराळय़ा वाटांचा शोध घेणारा एक नेमस्त तत्त्वज्ञ लोपला आहे.