28 February 2021

News Flash

अँड्रय़ू ब्रूक्स

 न्यू जर्सीत जन्मलेल्या डॉ. ब्रूक्स यांनी रुट्गर्स विद्यापीठातच, जनुकशास्त्र विभागात संशोधन केले.

अँड्रय़ू ब्रूक्स

जगात करोनाच्या अनेक चाचण्या आता उपलब्ध आहेत. बहुतेक चाचण्यांत नाकातून व तोंडातून नमुने घेतले जातात व ते तपासणीसाठी पाठवले जातात. त्यात नमुना घेताना तो योग्य प्रकारे घेतला गेला नाही तर त्यात चुका होऊ शकतात, पण ज्यांनी लाळेच्या माध्यमातून करोनावरील चाचणी शोधून काढली त्या अँड्रय़ू ब्रूक्स यांनी खरोखरच हे काम सोपे केले होते. आरोग्य कर्मचाऱ्यांनाही नमुने घेण्यात फारसे कौशल्य लागत नव्हते.. ही चाचणी शोधणारे ब्रूक्स यांचे नुकतेच निधन झाले.

‘अगदी अनपेक्षित असा मृत्यू’ असेच त्यांच्या या शेवटाचे वर्णन करावे लागेल. रुट्गर्स विद्यापीठात ते काम करीत होते. तेथील पिसकॅटवे प्रयोगशाळेत काम करीत असताना ‘करोना निदानासाठी नमुने घेताना लाळेचा वापर करता येईल व त्यातून रोगाचे निदान करता येईल’ हे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या नावाचा फारसा डंका पिटला गेला नसला तरी त्यांनी केलेले हे काम लाखमोलाचे होते.

न्यू जर्सीत जन्मलेल्या डॉ. ब्रूक्स यांनी रुट्गर्स विद्यापीठातच, जनुकशास्त्र विभागात संशोधन केले. ते तेथील एका संस्थेचे संचालकही होते. करोनाबाबत सारेच जण चाचपडत असताना ब्रूक्स यांनी लाळेची चाचणी शोधून काढली. आता ही पद्धत न्यू जर्सीत सगळीकडे वापरली जात असून त्यामुळे करोना निदानाची अचूकता वाढली आहे. आता नाकातून किंवा नाकाच्या अगदी आतल्या खोबणीतून नमुने घेण्याची गरज नाही. यात नमुने घेताना वेदनाही होत नाही. तुम्ही परीक्षानळीत थुंकी टाकायची. ती तपासून ‘सार्स सीओव्ही २’ या करोना विषाणूचे अचूक निदान करण्याची ही पद्धत महत्त्वाचीच ठरली. या चाचणीत एकच उणीव होती ती म्हणजे निकाल येण्यास तीन दिवस लागत होते. पण असे असले तरी करोनाचा सुरुवातीचा काळ बघता (चाचण्यांचे निकाल यायला १० दिवस लागत) ही उणीव होती असेही म्हणता येणार नाही. आता लाळेच्याही चाचणीचे तंत्रज्ञान प्रगत झाले असून त्यात २४ तासांत निकाल हाती येतात. नाकातील द्रव घेऊन तर काही मिनिटांत निकाल हाती येतात. ब्रूक्स हे अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाचे सल्लागारही होते. त्यांनी सत्तरहून अधिक शोधनिबंध लिहिले होते. हार्लन जीनस्क्रीन लॅबोरेटरीचे संचालक व बायोप्रोसेसिंग सोल्यूशन्स अलायन्स या संस्थेचे सहसंस्थापक संचालक म्हणून त्यांनी काम केले. इन्फिनिटी बायोलॉजिक्स या खासगी उद्योगात त्यांनी सल्लागाराची भूमिका पार पाडली. त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसाठी त्यांचे हे अनपेक्षित जाणे धक्कादायक, करोना विषाणू नवनवीन लाटांवर स्वार होऊन येत असताना इतरांसाठी हानिकारक होते यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 12:01 am

Web Title: andrew brooks profile abn 97
Next Stories
1 डॉ. कल्याण काळे
2 सुनील कुमार
3 शरू रांगणेकर
Just Now!
X