News Flash

अण्णाजी मेंडजोगे

विदर्भ अर्बन बँक्स को-ऑप. असोसिएशन संस्था स्थापन केली.

अण्णाजी मेंडजोगे

विदर्भाच्या सहकार क्षेत्रात सहकारमहर्षी म्हणून ओळखले जाणारे मनोहर उपाख्य अण्णाजी मेंडजोगे यांचे अलीकडेच निधन झाले. अनेक सहकारी बँकांना उभारी देण्याचे काम अण्णाजींनी केले.

१० एप्रिल १९३१ ला हिंगणा येथे जन्मलेले मेंडजोगे यांचे प्राथमिक शिक्षण हिंगणा, तर उच्चशिक्षण नागपूर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय व हिस्लॉप महाविद्यालयात झाले. संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे शिक्षण घेतल्यानंतर अण्णाजींचे आकर्षण जनसंघाकडे वाढले व त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले. गरिबांच्या मुलांसाठी इतवारी हायस्कूलमध्ये एका खोलीत त्यांनी शिकवणी वर्ग घेतले. पुढे त्याच शाळेत इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून रुजू झाले. येथे ३५ वर्षे अध्यापन केले.  त्याच काळात त्यांनी सहकार क्षेत्राचा अभ्यास सुरू केला. नागपूर अर्बन को-ऑप. बँक लि. या बँकेत त्यांनी काम केले. सहकार क्षेत्रात काम करीत असल्यामुळे सहकार हेच विकासाचे साधन असल्याचे ध्येय समोर ठेवत त्यांनी कार्य केले. शिक्षकांसाठी बँक असावी यासाठी त्यांची धडपड सुरू होती. शाळेतील चार शिक्षकांनिशी त्यांनी पतसंस्था सुरू केली आणि पुढे १९ सप्टेंबर १९७५ रोजी शिक्षक सहकारी बँकेची स्थापना केली. त्याच काळात शिक्षक परिषदेचीही स्थापना करून शिक्षकांना संघटित केले. विदर्भात त्या काळात २४ नागरी सहकारी बँकांपैकी मोजक्याच चांगल्या स्थितीत होत्या. सर्व बँकांच्या संचालकांना एकत्र करून त्यांनी दोन राज्यस्तरीय नागरी परिषदा आयोजित केल्या. विदर्भ अर्बन बँक्स को-ऑप. असोसिएशन संस्था स्थापन केली. त्यानंतर विदर्भातील आजारी बँकांच्या पुनर्वसनासाठी मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व नागपूर विभागातील बँकांच्या पुनर्वसन समितीशी चर्चा करून बँका चांगल्या स्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केले. त्या काळात विदर्भातील लोकमान्य सहकारी साखर कारखाना बंद झाला होता. अण्णाजींनी पुढाकार घेतला आणि १९ एप्रिल २०००ला ‘पूर्ती साखर कारखान्या’ची निर्मिती झाली. अण्णाजी या साखर कारखान्याचे सल्लागार म्हणून अनेक वर्षे काम पाहत होते. विदर्भ अर्बन बँक्स असोसिएशन, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन, अपेक्स बँक, नागपूर नागरिक बँक,  विदर्भ प्रीमियर को-ऑप. सोसायटी, गोरक्षण सभा, जैन कलार समाज या संस्थेत त्यांनी विविध पदांवर काम केले. विदर्भ गौरव प्रतिष्ठान, महाराष्ट्र सहकारी फेडरेशनचा सहकार महर्षी पुरस्कार आदी पुरस्कार त्यांना मिळाले. किती जगलो यापेक्षा कसे जगलो याचा विचार केला तर माणसाच्या हातून चांगलेच काम घडेल, या विचारावर त्यांची श्रद्धा होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 12:59 am

Web Title: annaji mendjoge founder president of teachers co operative bank
Next Stories
1 अ‍ॅलन क्रूगर
2 डॅरिल  डिमॉन्टे
3 वेद राही
Just Now!
X