‘प्लास्टिकपासून हृदय बनविण्याचा प्रयत्न’ अशी १९६०च्या दशकात कुणा वृत्तपत्राने छापलेली बातमी वाचून बहीण भावाला म्हणते आहे, ‘त्यात बातमी देण्यासारखे काय एवढे? आपल्या बाबांचे हृदय तर दगडाचे आहे.. आई म्हणते ना!’

‘किती हे होमवर्क.. थकवणारा प्रकार आहे होमवर्क म्हणजे..’ असे म्हणणाऱ्या मुलाला स्वयंपाकघरातून आई विचारते, ‘माझ्याबद्दल काही म्हणतोयस का?’

१९६०च्या दशकातील मध्यमवर्गीयांची नेमकी नस पकडणारी ही भाष्ये व्यंगचित्रांमधून करणारे आणि तेव्हापासून अगदी अलीकडेपर्यंत ही नस ओळखून व्यंगचित्रे काढत राहिलेले ज्येष्ठ व्यंगचित्रकार सुधीर दर मंगळवारी (२६ नोव्हेंबर) वयाच्या ८७ व्या वर्षी निवर्तले. त्यांच्या निधनामुळे ‘व्यंगचित्रांच्या सुवर्णकाळाचा दुवा निखळला’ असेही म्हटले गेले. तसे पाहता दर हे ‘शंकर’ आदी व्यंगचित्रकारांच्या नंतरचे, म्हणजे स्वतंत्र भारतातल्या दुसऱ्या व्यंगचित्रकार पिढीतले. पण आर. के. लक्ष्मण, अबू, ओ. व्ही. विजयन, काक, राजिंदर पुरी आदी व्यंगचित्रकारांचा काळ हा ‘सुवर्णकाळ’ मानल्यास सुधीर दर हे त्या काळाचा दुवा होते. यापैकी अबू किंवा विजयन यांची चित्रे राजकीय कृती वा विचारांवर खणखणीत भाष्य करणारी असत, तर इतरांची बरीच चित्रे ही सामान्य वृत्तपत्र-वाचकांच्या (म्हणजे त्या काळातील सुशिक्षित, नोकरदार मध्यमवर्गीयांच्या) दृष्टिकोनातून राजकारणाकडे पाहणारी असत. लक्ष्मण यांचा ‘कॉमन मॅन’ राजकारण्यांच्या बोलांनी चक्रावून जाण्याचा हाच तो काळ. सुधीर दर यांनी या मध्यमवर्गातील अंतर्विरोधही ओळखले होते. परंपराप्रियता आणि आधुनिक जगाचे आश्वासन यांत हा मध्यमवर्ग नेहमीच चक्रावलेला असतो, हे सुधीर यांनी जाणले होते. समाजनिरीक्षण ही त्यांची खासियत. त्यांची राजकीय व्यंगचित्रे कुणा नेत्याला, पक्षाला धारेवर धरण्यापेक्षा नेमकी पंचाईत कुठे आहे, हे ओळखण्याचा प्रयत्न करीत. भारतीय निवडणूक प्रक्रियेवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या व्यंगचित्रांचे निराळे पुस्तकच (मॅड, मॅड वर्ल्ड ऑफ इलेक्शन्स – २००४) निघाले, ते या गुणाची साक्ष देते. यातील एक व्यंगचित्र बोचरे आहे : खुर्चीवरल्या साहेबांपुढे अधिकारी उभे. साहेब स्वीय सचिवाला विचारताहेत, ‘हे सारे खुल्या वातावरणात, निधरेकपणे, पारदर्शकपणे निवडणूक घेण्यास समर्थ आहेत का?’ सचिवाचे उत्तर- ‘होय साहेब’.. त्यावर साहेब म्हणतात, ‘मग बदल्या करून टाका ना त्यांच्या!’

त्या चित्रातले साहेब कुणाहीसारखे दिसत नव्हते, हे विशेष. व्यक्तीपेक्षा प्रवृत्तीवर रोख ठेवणाऱ्या सुधीर दर यांनी कुठल्याही औपचारिक शिक्षणाविना, निव्वळ थोडीफार देशी-विदेशी व्यंगचित्रे पाहून हे प्रावीण्य मिळवले आणि ‘स्टेट्समन’, ‘हिंदुस्तान टाइम्स’ आदी वृत्तपत्रांतून स्वत:चा ठसा उमटवला.