पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्तेत आल्यानंतरचा ‘मेक इन इंडिया’ हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प. त्यासाठी मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीत सप्ताह सोहळाही आयोजित केला गेला. नवीन गुंतवणूक, प्रकल्प याबाबत गेल्या चार वर्षांत नेमके कितपत साध्य झाले हे सिद्ध करणारी आकडेवारीही नाही. एक मात्र खरे की या ‘मेक इन इंडिया’ घोषणेमुळे अनेक एमएनसी अर्थात मल्टी नॅशनल कंपन्या म्हणजेच विदेशातील आघाडीच्या कंपन्यांनी भारतातून उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

दोन दिवसांपूर्वी नवी नियुक्ती जाहीर करणाऱ्या फ्रेंच कंपनी एअरबसचे तेच. अमेरिकी बोइंगची ही कट्टर स्पर्धक कंपनी. ‘मेक इन इंडिया’ला प्रेरित होऊनच कंपनीने देशातील संरक्षण क्षेत्रातील व्यवसायातील स्थान भक्कम करण्याचे निश्चित केले. आणि ही महत्त्वाची जबाबदारी आता मराठमोळ्या नेतृत्वाकडे देण्यात आली. एअरबसच्या हेलिकॉप्टर व्यवसाय विभागाचे प्रमुख म्हणून आशीष सराफ यांची नियुक्ती प्रत्यक्षात आली आहे. सराफ जानेवारी २०१६ पासून कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून औद्योगिक विकास तसेच भागीदारी विभागाची जबाबदारी हाताळत होते. थर्मेक्स, डेलॉइटसारख्या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्य करणाऱ्या सराफ यांचा एकूणच संरक्षण क्षेत्रातील हवाई साधने, उपकरण निर्मिती क्षेत्रातील अनुभव मोठा आहे.  टाटा समूहाचे संरक्षण क्षेत्रातील अंग असलेल्या भागीदारीतील कंपनीतही ते काही काळ होते.

नागपूर आणि पुण्याच्या अनुक्रमे विश्वेश्वरैय्या एनआयटी व सिम्बॉयसेस आयबीएमचे पदवीधर राहिलेल्या सराफ यांनी विदेशातील अनेक विद्यापीठातून उच्च व्यावसायिक शिक्षण घेतले आहे. सराफ यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने जूनमधील सर्वोच्च एअरबस विमानांची विक्री नोंदविली आहे. तर स्वत: सराफ हे हवाई क्षेत्रातील कार्यात उच्च गुणवत्ता राखणारी उत्पादने विकसित करणारे उत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही गौरविले गेले आहेत. एअरबसकडे आजच्या घडीला १०० हून अधिक हेलिकॉप्टर असून वैद्यकीय तसेच पर्यटन सुविधा पुरविणाऱ्या व्यवसायातही सराफ यांचे मार्गदर्शन कंपनीला लाभणार आहे.

मात्र सराफ यांची नवी निवड ही कंपनीला भारताच्या संरक्षण क्षेत्रात पाय अधिक घट्ट रोवण्याच्या दिशेने झाली आहे. या क्षेत्रात सध्या देशी टाटा तसेच महिंद्र अँड महिंद्र समूह आहेच. तुलनेत सराफ यांच्या नेतृत्वाखाली अधिक उल्लेखनीय कामगिरी बजाविण्याच्या दृष्टिकोनातून ही नियुक्ती एअरबस समूहासाठी महत्त्वाची ठरणार आहे.