वयाच्या पाचव्या वर्षी पंडित पन्नालाल घोष यांच्याकडे असलेल्या अनेक बासऱ्यांपैकी एक मागण्याचा हट्ट करणाऱ्या आणि त्यानंतर आईकडून भरपूर शाब्दिक मार मिळालेल्या बुद्धदेव दासगुप्ता यांना आपण कधी संगीताच्या क्षेत्रात नाममुद्रा उमटवू, असे वाटले नव्हते. वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे सतत गावोगाव फिरत राहणाऱ्या दासगुप्ता कुटुंबात संगीताची आवड होती, त्यामुळे घरात संगीतकारांचे येणे-जाणे असायचेच. वयाच्या नवव्या वर्षी ज्येष्ठ सरोदिये राधिका मोहन मैत्र यांच्याशी त्यांची गाठ पडली आणि मग त्यांच्या हाती आलेले सरोद हे वाद्य जीवनाच्या अखेरीपर्यंत त्यांची स्वरसंगत करीत राहिले.

मैहरच्या बाबा अल्लादीन खान यांनी सरोद, सतार, बासरी या वाद्यांवर मिळवलेले प्रभुत्व आणि घडवलेली शिष्यपरंपरा, त्या काळात भारतीय संगीताच्या क्षेत्रात अक्षरश: तळपत होती. त्यांचे पुत्र उस्ताद अली अकबर खाँ हे तर थोर सरोदिये. (बुद्धदेवजींनी) हे सारे ऐकत असतानाच आपल्या गुरूकडून मिळत असलेल्या ज्ञानावर स्वत:चा अभ्यास सुरू केला आणि त्यातून सेनिया शाहजहानपूर हे घराणे निर्माण झाले. गुरू पंडित राधिका मोहन मैत्र यांना या दोन्ही घराण्याची तालीम मिळाली होती, परंतु बुद्धदेवजींनी त्यात मोठी भर घातली आणि एक नवी शैलीच निर्माण केली. मेकॅनिकल इंजिनीअर म्हणून अनेक वर्षे नोकरी करत असतानाही, त्यांना संगीताचे वेड स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळेच नोकरी आणि मैफिली अशी तारेवरची कसरत करताना मनातल्या मनात रियाज करण्याची कला त्यांनी अवगत केली. अखेर संगीतालाच जवळ केले आणि सरोद या वाद्याचा, तसेच भारतातील विविध संगीत घराण्यांचा अभ्यास त्यांनी केला. घराण्याच्या परंपरेत राहून वेगळी वाट चोखाळणारे सरोदिये म्हणून त्यांची ओळख होऊ लागली. सरोदवर रबाब या वाद्यातील विशिष्ट शैली त्यांनी आत्मसात केली. त्याबरोबरच या वाद्यावर तालवाद्यातील बोलकारीचाही अंतर्भाव केला. रागदारी संगीतात रवींद्र संगीताचा मिलाफ कसा करता येईल, याचा विचार त्यांनी केला, त्यामुळेही त्यांचे सरोदवादन वेगळेपणाने उठून दिसू लागले.

संगीत प्रभाकर आणि संगीत प्रवीण या पदव्या त्यांनी मिळवल्या, आकाशवाणीवरील एक नामांकित वादक म्हणून त्यांना मान्यता मिळाली. भारतीय रागदारी संगीताबरोबरच पाश्चात्त्य अभिजात संगीताचाही त्यांनी अभ्यास सुरू केला आणि त्यातून जगभरात संगीतावरील प्रात्यक्षिके त्यांना सादर करता आली. संगीत नाटक अकादमी, शिरोमणी पारितोषिक, अल्लादीन पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांबरोबरच भारत सरकारचा ‘पद्मभूषण’ हा किताबही त्यांना मिळाला. रागाचा भाव ओळखून त्याची मांडणी करण्यावर त्यांचा भर असे. त्यांचे भावदर्शन आणि त्यातील नजाकत यामुळे त्यांचे वादन रसिकांच्या मनाचा ठाव घेत असे. उत्तम गुरू असलेल्या बुद्धदेवजींकडे नयन घोष, देबाशीष भट्टाचार्य, सुगातो नाग यांच्यासारख्या नामांकित कलावंतांनी संगीताचे धडे गिरवले. एक उत्तम वादक, वक्ता, संशोधक आणि गुरू बुद्धदेव दासगुप्ता यांच्या निधनामुळे आपल्यातून निघून गेला आहे.