विद्रोह, संघर्ष हे सारे आपल्याला झेपणार नाही म्हणून कलावंत मंडळी बाजूला सरतात (आणि फारतर पत्रांवर स्वाक्षऱ्या करतात) असे अनेकदा दिसते. किंवा मग, ‘विद्रोही कलावंत’ हे इतर कलावंतांपेक्षा निराळी चूल मांडतात. या दोन्ही मळवाटा नाकारणारा प्रयोगशील विद्रोहाचा मार्ग कार्लोस सेल्ड्रान याने शोधून काढला होता.  या मार्गात ‘वाटाडय़ा’ किंवा ‘टूरिस्ट गाइड’ म्हणून काम करणे हाही एक भाग होता! तो कसा ते नंतर पाहूच.. पण कार्लोसबद्दल आजच लिहिण्याचे कारण म्हणजे वयाच्या ४७ व्या वर्षी, करण्यासारखे खूप बाकी असताना झालेला त्याचा मृत्यू!

कार्लोस हा फिलिपाइन्समध्ये जन्मला, वाढला. मनिला या राजधानीच्या शहरात स्पॅनियार्ड वडील आणि फिलिपिना आई यांनी त्याला ‘लायकीपेक्षा जास्त तुला मिळणार नाही, कष्टाची कमाईच पचते’ यासारखे मध्यमवर्गीय संस्कार दिले. मनिलातच तो शिकला आणि पुढे त्याच्या कलानुसार, ‘ऱ्होड आयलंड स्कूल ऑफ आर्ट’ या कलासंस्थेतून १९९६ साली चित्रकलेची पदवी त्याने घेतली. मात्र याच काळात त्याचा ओढा ‘परफॉर्मन्स आर्ट’कडेही वळू लागला.  कलेचा हा नवप्रकार नाटकापेक्षा निराळा, दृश्यकलेचे तत्त्वज्ञान स्वीकारणारा आहे, इथे ‘मीच रंग आणि मीच ब्रश असतो’ असे तो म्हणे. आर्ट गॅलऱ्यांत, प्रेक्षकांना पूर्वकल्पना देऊन होणारे या कलेचे प्रयोग त्याला कसनुसे वाटत. मग, ‘मनिला शहराच्या इतिहासातून फेरफटका’ या दोनतीन तास पायी चालण्याच्या उपक्रमातून, प्रेक्षकांना तो या शहराचा राजकीय इतिहास किती रक्तरंजित आहे, दुसऱ्या महायुद्धात विनाकारण जीव गेलेच पण नंतरही सत्ताधाऱ्यांनी काय केले, याची आठवण देऊन तो आजच्या कार्यकर्त्यांना बळ देई. हे करताना रंजकता, दृश्यभान कायम ठेवल्यामुळे प्रतिसाद वाढू लागला. फेसबुक आदी समाजमाध्यमांवरही दबदबा वाढला. २०१० साली, फिलिपाइन्सच्या ख्रिस्ती धर्मगुरूंच्या इच्छेनुसार ‘गर्भपात हा फौजदारी गुन्हा’ मानणारा कायदा झाला, त्याविरोधात त्याने अभिनव निदर्शने केली. ख्रिस्ती धर्मगुरूंच्या सर्वोच्च बैठकीत शिरून त्याने ‘दमासो’ लिहिलेला फलक फडकावून फोटो काढून घेतले! ‘दमासो’ हे फिलिपाइन्सचा राष्ट्रीय  साहित्यिक, जोस रिझाल (१८६१-१८९६) याच्या कादंबरीतील ख्रिस्ती पाद्रय़ाचे कुटिल पात्र. कार्लोसने त्याची आठवण देणे संबंधितांना चांगलेच झोंबले. खटल्याला वेग आला, तो मात्र २०१६ नंतर, डय़ुटेर्टे राजवटीत. अखेर कार्लोसने स्पेनमध्ये आश्रय घेतला. तेथे त्याच्या कलेचे चीज होत असताना, येत्या डिसेंबरात त्याचे कला-प्रदर्शनही जपानला होणार असताना त्याची निधनवार्ता आली. फिलिपाइन्सच्या अनेक विवेकी कार्यकर्त्यांचा आधार त्यामुळे हरपला आहे.