वैज्ञानिक, सामाजिक विषयांवर चतुरस्र लेखन करणाऱ्या चित्रा बेडेकर यांची निधनवार्ता बुधवारी आली आणि या उत्फुल्ल लेखिकेचे अचानक सोडून जाणे हे अनेकांना चटका लावणारे ठरले. चित्रा यांचा जन्म ७ ऑगस्ट १९४६ चा. भौतिकशास्त्रात एमएस्सी केल्यानंतर त्यांनी काही काळ मुंबईत अध्यापन व नंतर पुणे येथील एआरडीईच्या (केंद्रीय संरक्षण खात्याच्या) संशोधन संस्थेत वैज्ञानिक अधिकारी म्हणून काम केले. एआरडीईमधील अल्पकाळच्या कारकीर्दीत त्यांना शस्त्रास्त्रनिर्मिती प्रकल्पांत काम करता आले. गेल्या सुमारे चार दशकांपासून त्या विविध सामाजिक चळवळींशी जोडलेल्या होत्या. लोकविज्ञान चळवळ ही त्यापैकी एक. ‘ऑल इंडिया पीस अ‍ॅण्ड सॉलिडॅरिटी ऑर्गनायझेशन’चे कामही त्यांनी केले. याच काळात वैज्ञानिक, सामाजिक व राजकीय विषयांवर विविध पुस्तके, तसेच नियतकालिके आणि दैनिकांमधून विपुल लेखनही त्यांनी केले. अणुविज्ञान आणि त्या अनुषंगाने येणारे मुद्दे, पर्यावरण, शांतता चळवळ, नवी आर्थिक धोरणे, शीतयुद्ध, आरोग्य, शाश्वत विकास अशा अनेक विषयांवर त्यांनी लिहिले आहे. अभ्यासपूर्ण, तरीही सोप्या शैलीतील त्यांचे हे लिखाण सर्वच स्तरांतील वाचकांना आवडे.

त्यांची ग्रंथसंपदा वैविध्यपूर्ण होती. ‘एड्स’, ‘स्फोटकांचे अंतरंग’, ‘शोधातल्या गमतीजमती’, ‘मेंदूच्या अंतरंगात’ ही वैज्ञानिक विषयांवरील पुस्तके त्यांनी लिहिलीच, शिवाय बालवाचकांसाठी अलेक्झांडर ग्रॅहम बेल, अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्यावरील छोटेखानी चरित्र-पुस्तिकाही लिहिल्या. ‘अण्वस्त्रे, शस्त्रस्पर्धा आणि शांतता आंदोलन’ या पुस्तकात त्यांनी अण्वस्त्रांना विरोध कशासाठी करावा, याची मांडणी सोप्या भाषेत केली आहे. १९८८ सालचा सोव्हिएत लॅण्ड नेहरू पुरस्कारही या पुस्तकास मिळाला. ‘माणुसकीच्या अल्याड-पल्याड’ हे दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले त्यांचे पुस्तक. त्यात फ्रेंच लेखक रोमाँ गारी यांची एका भटक्या जर्मन शेपर्ड कुत्र्याच्या सान्निध्यातील अनुभवांवर आधारित ‘व्हाइट डॉग’ (१९७०) ही लघुकादंबरी, त्यावरील चित्रपट, गारी यांचा जीवनपट आणि या काळाला लगडून असणारे वर्णवंशभेदाचे राजकारण यांविषयी वाचायला मिळते.

याशिवाय काही अनुवादही चित्रा यांनी केले. त्यांपैकी ‘समाजवादाचे तत्त्वज्ञान’ (मॉरिस कॉर्नफोर्थ लिखित पुस्तकाचा अनुवाद), ‘स्मरणचित्रे’ (भगतसिंह यांचे जवळचे साथीदार शिववर्मा यांचे पुस्तक), ‘विवेकानंदांचे सामाजिक-राजकीय विचार’ (विनयकुमार रॉय लिखित पुस्तिका) हे पुस्तकरूपाने प्रकाशित झाले आहेत. याशिवाय १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस भगतसिंह यांची दोन पुस्तके – ‘मी नास्तिक का आहे?’ व ‘आम्ही कशासाठी लढत आहोत?’ त्यांनी मराठीत आणली. भगतसिंह यांच्या क्रांतिकारकत्वामागची डाव्या विचारांची बैठक या अनुवादांमुळे मराठीत प्रथमच अधोरेखित झाली. एकूणच सुस्पष्ट वैचारिक भूमिका त्यांनी लेखनात कुठे लपवली नाहीच, पण मराठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची धडपड त्यांच्या लेखनातून दिसून येते.