संगणक  ही पूर्वी अप्रूपाची गोष्ट होती, अगदी सुरुवातीचे संगणक  ठेवण्यास एक  पूर्ण खोली लागत असे! आता तो जमाना मागे पडला; आपल्या हाताच्या तळव्यावर मावतील असे पामटॉप संगणकही आता उपलब्ध आहेत. ही सगळी स्थित्यंतरे डिजिटल तंत्रज्ञानातील बदलांमुळे होत गेली. ज्यांच्या संशोधनामुळे व्यक्तिगत वापराचा संगणक  (म्हणजे पीसी) आणि ग्राहकोपयोगी संगणकांत बरेच बदल झाले, त्या चक  पेडल यांचे नुकतेच निधन झाले. संगणक  अभियंता असलेल्या पेडल यांनी १९७७ मध्ये एक  चिप तयार केली होती, त्यामुळे संगणकांमध्ये बरेच बदल झाले होते. अभियंता व उद्योजक  असलेल्या पेडल यांनी व्यक्तिगत वापराच्या संगणकांच्या किमती कमी होण्याच्या प्रक्रियेत कळीची भूमिका पार पाडली होती. त्यांनी कमी किमतीची चिप (सूक्ष्म संस्कारक- मायक्रो प्रोसेसर) तयार केली होती. आजच्या काळात या सूक्ष्म संस्कारकांमध्ये फारच क्रांतिकारी बदल झाले असले, तरी त्याची मुहूर्तमेढ ही पेडल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रचली होती.

अमेरिकेत जन्मलेले चक पेडल यांना लहानपणी रेडिओ उद्घोषक व्हायचे होते. मात्र, पुढे ते अभियांत्रिकीच्या शिक्षणाकडे वळले आणि ते पूर्ण झाल्यावर ‘जनरल इलेक्ट्रिक ’मध्ये रुजू झाले. तेथे त्यांनी काही अवकाश वाहने, इलेक्ट्रॉनिक  यंत्रे, संगणक  यांची रचना केली. त्यानंतर ‘मोटोरोला कॉर्पोरेशन’ या कंपनीत कार्यरत असताना पेडल यांनी ‘६८००’ हा सूक्ष्म संस्कोरक  तयार केला होता, त्याची किंमत तेव्हा ३०० डॉलर्स इतकी जास्त होती. पेडल यांना संगणक सामान्यांच्या क क्षेत आणायचा होता, पण कंपन्यांना ते मान्य नव्हते.

मात्र, संगणक  उत्पादने सामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी चिपची किंमत कमी करणे आवश्यक  आहे, हे पेडल यांनी जाणले होते. ते ज्या ‘मोटोरोला कॉर्पोरेशन’मध्ये काम करत होते, त्या कंपनीने त्यांच्या या विचारास विरोध केला. पण पेडल यांनी प्रयत्न सोडले नाहीत. ते नव्या चिपचा प्रस्ताव घेऊन प्रतिस्पर्धी कंपनीकडे गेले. जाताना सोबत ‘मोटोरोला’मधील सात अभियंत्यांनाही नेले. त्यांनी  व त्यांच्या या सहकाऱ्यांनी मिळून २५ डॉलर्स किमतीची ‘६५०२’ ही चिप बनवली. चार जणांचे जेवण त्या काळी २५ डॉलर्समध्ये होत असे! त्यांच्या या किफायतशीर चिपमुळे व्यक्तिगत संगणकांचे नवे रूप आकाराला आले. नंतर मात्र ‘इंटेल’ने अशा चिपची बाजारपेठ काबीज केली.

पेडल यांनी पुढील काळात ‘किम १’ ही चिप तयार केली. ती त्यांनी स्टीव्ह जॉब्ज व स्टीव्ह वोझनिअ‍ॅक  यांना विकली, जे त्या वेळी ‘अ‍ॅपल’ कंपनी स्थापण्याच्या खटपटीत होते. त्या काळात पेडल यांनीही स्वत:ची कंपनी स्थापन क रून ‘कमोडोर पेट’ हा संगणक  तयार केला होता. त्यांनी ‘एनएनए कॉर्पोरेशन’ ही कंपनी स्थापन करून पोर्टेबल हार्ड ड्राइव्ह तयार केले. पेनड्राइव्हची ती सुरुवात होती.

आता संगणकीय जग कितीही पुढे गेले असले, तरी सूक्ष्म संस्कारक  (चिप) हा त्याचा घटक   पुढेही कायम राहणार आहे आणि तोवर चक पेडल यांचे स्मरणही कायम राहणार आहे!